ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय

तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात ‘फ्रेंडली फायर’ की राजकीय डाव; निकटवर्तीय पोटफोडे गोगावले यांच्या गोटात, रोह्यातील राजकीय मोहरे हलवतंय कोण?

निकटवर्तीय पोटफोडेंचा शिंदेसेनेत प्रवेश; नाराजीचा मागमूस नाही, मग ‘मोहरा’ पुढे करण्याचा डाव तर नाही ना?


 

फडशा

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

आविष्कार देसाई

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या राजकीय बालेकिल्ल्यात संतोष पोटफोडे यांच्या पक्षप्रवेशाने खळबळ उडाली आहे. रोहा शहराचे माजी नगराध्यक्ष आणि तटकरेंचे निकटवर्तीय असलेले संतोष पोटफोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. पालकमंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेला हा प्रवेश वरवर पाहता तटकरेंच्या बालेकिल्ल्यावर शिंदेसेनेची मोठी राजकीय चढाई असल्याचे दिसते. मात्र, या चढाईमागे नेमके कोणाचे राजकीय गणित आहे, अशी चर्चा रोह्यात होत आहे.

कारण पोटफोडे हे काही तटकरेंचे राजकीय विरोधक नव्हते. ते तटकरेंच्या निकटवर्तीयांमध्ये गणले जात होते. विशेष म्हणजे पक्षप्रवेशापूर्वी तटकरे आणि पोटफोडे यांच्यात कोणत्याही प्रकारची नाराजी असल्याच्या चर्चा सार्वजनिकपणे पुढे आल्या नव्हत्या. उलट, सुनील तटकरे यांनी पोटफोडे यांना स्थानिक राजकारणात महत्त्वाचे स्थान दिले. रोहा नगराध्यक्षपदासारखी महत्त्वाची राजकीय जबाबदारी त्यांच्या वाट्याला आली. त्यामुळे ‘नाराज झाले म्हणून पक्ष सोडला’ हे सोपे स्पष्टीकरण या राजकीय घडामोडीला पूर्णपणे लागू पडत नाही.

त्यांना तटकरेंनी राजकीय स्थान दिले, ज्याच्याशी जवळीक होती, ज्या नाराजीची कोणतीही उघड पार्श्वभूमी नव्हती, तीच व्यक्ती अचानक प्रतिस्पर्ध्याच्या गोटात का गेली? तटकरेंच्या बालेकिल्ल्यातून तटकरेंच्याच निकटवर्तीयाने प्रतिस्पर्धी पक्षाचा झेंडा हाती घेणे ही शिंदेसेनेची राजकीय चढाई आहे की यामागे आणखी काही मोठे राजकीय गणित दडले आहे, हा सवाल आता उपस्थित होत आहे.

राजकारणात शत्रूच्या गोटात गेलेला प्रत्येक माणूस शत्रूच असतो असे नाही. निवडणुकीच्या रणांगणात प्रत्यक्ष लढाई सुरू होण्याआधीच मोहरे हलवले जातात. कोण कुठे उभा आहे, कोणाची कोणाशी जवळीक आहे, कोणत्या भागात कोणाचा प्रभाव आहे आणि कोणता कार्यकर्ता कोणाबरोबर जाणार आहे, याची चाचपणी सुरू असते. त्यामुळे पोटफोडे यांचा प्रवेश हा शिंदेसेनेचा सरळ विजय मानायचा की तटकरेंच्या राजकीय रणनीतीचा एखादा अनपेक्षित भाग, हा प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाही.

पोटफोडे यांना तटकरेंनी जाणीवपूर्वक शिंदेसेनेत पाठवले, असा कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. मात्र, नाराजी नाही, उघड संघर्ष नाही आणि तरीही तटकरेंच्या निकटवर्तीयाचा अचानक पक्षबदल होतो, ही विसंगती राजकीय चर्चेला निश्चितच वाव देते. म्हणूनच ‘फ्रेंडली फायर’ झाला आहे की एखादा राजकीय मोहरा प्रतिस्पर्ध्याच्या गोटात पुढे केला गेला आहे, अशी चर्चा सुरू होणे स्वाभाविक आहे.

या संपूर्ण घडामोडीला रायगडच्या व्यापक राजकारणाच्या पटावर पाहिले तर त्याला आणखी एक महत्त्वाचा संदर्भ मिळतो. पालकमंत्रीपद शिवसेनेकडे गेल्याने भरत गोगावले यांच्याकडे जिल्ह्यातील प्रशासकीय आणि राजकीय वजन वाढले आहे. या वजनाचा वापर करून जिल्हाभर शिवसेनेचा संघटना विस्तारण्याचा आणि स्थानिक पातळीवर आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न होणे स्वाभाविक आहे. त्यातच तटकरे यांच्या प्रभावक्षेत्रातील रोह्यातील महत्त्वाच्या राजकीय चेहऱ्याला आपल्या गोटात आणणे ही केवळ पक्षप्रवेशाची घटना मानणे राजकीयदृष्ट्या अगदी भोळेपणाचे ठरेल.

हा केवळ एक पक्षप्रवेश आहे की तटकरेंच्या प्रभावाला थेट आव्हान देण्याची सुरुवात आहे, हा प्रश्न आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अधिक स्पष्ट होईल. कारण एखादा नेता पक्ष सोडतो म्हणून बालेकिल्ला एका दिवसात कोसळत नाही आणि एखादा नेता प्रतिस्पर्ध्याच्या गोटात गेला म्हणून प्रतिस्पर्ध्याचा विजयही निश्चित होत नाही. खरी ताकद मतपेटीत दिसते आणि खरी संघटनात्मक ताकद निवडणुकीच्या रणांगणात दिसून येते.

संतोष पोटफोडे यांच्या राजकीय प्रवेशाकडे पाहताना त्यांच्या क्रीडा कारकिर्दीचे उदाहरण अधिक बोलके ठरते. पोटफोडे हे उत्तम कबड्डीपटू असून खो-खोमध्येही त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. ऐन उमेदीच्या काळात त्यांच्या कबड्डी आणि खो-खोच्या खेळाची जिल्हाभर चर्चा होती.

कबड्डीत चढाई करणारा खेळाडू प्रतिस्पर्ध्याच्या गोटात शिरतो. बोनस लाईनपर्यंत पोहोचतो. समोरच्या संघाला वाटते की आता हा आपल्या ताब्यात आला. पण अनुभवी खेळाडू योग्य क्षणी पकडीतून निसटतो आणि परतताना प्रतिस्पर्ध्याचे एक-दोन नव्हे तर तब्बल पाच सहा खेळाडू बाद करून आपल्या गोटात परततो. त्यामुळे पोटफोडेंची ही राजकीय चढाई नेमकी कशासाठी आहे, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो. ते भरत गोगावले यांच्या गोटात गेले म्हणून त्यांनी बाजी मारली, असे म्हणणे घाईचे ठरणार आहे.

आज भरत गोगावले आणि महिंद्र दळवी यांना तटकरेंच्या बालेकिल्ल्यात मोठी सेंध लागल्याचे दिसत आहे. मात्र या चढाईतून प्रत्यक्ष निवडणुकीत किती राजकीय गुण मिळतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पोटफोडे यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे भरत गोगावले यांच्या संघटनात्मक ताकदीत वाढ होण्याची शक्यता नक्कीच आहे. पण याच प्रवेशामुळे तटकरेंच्या संघटनेला किती प्रत्यक्ष नुकसान झाले, हे अजून स्पष्ट झालेले नाही.

उलट, आता खरी उत्सुकता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील प्रत्युत्तराकडे आहे. तटकरे या प्रवेशाला केवळ दुर्लक्ष करतात की त्यामागे काही वेगळी राजकीय चाल खेळतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कारण राजकारणात एका मोहर्‍याला प्रतिस्पर्ध्याच्या गोटात पाहून विजय साजरा करण्यापेक्षा त्यानंतर कोणते दहा मोहरे कोणत्या खाण्यात(घरात) हलवले जातात, हे अधिक महत्त्वाचे असते.

महाराष्ट्राच्या राजकारणाने अशा अनपेक्षित राजकीय चाली यापूर्वीही पाहिल्या आहेत. अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीपासून पुढे घडलेल्या घटनांनी महाराष्ट्राला एक धडा दिला. राजकारणात पहिल्या काही तासांत दिसणारे चित्र हे अंतिम चित्र असेलच असे नाही. त्यामुळे पोटफोडे यांच्या प्रवेशालाही आजच अंतिम राजकीय धक्का तंत्र समजणे धोकादायक ठरेल.

म्हणूनच रोह्यातील या पक्षप्रवेशाकडे केवळ ‘तटकरे यांना धक्का’ या चौकटीत पाहणे शहाणपणाचे नाही. खरा प्रश्न संतोष पोटफोडे कोणत्या पक्षात गेले, एवढाच नाही. प्रश्न हा आहे की त्यांनी गोट बदलला आहे की कुणीतरी त्यांना गोट बदलायला लावून मोठ्या राजकीय खेळाचा मोहरा पुढे केला आहे? जर हा तटकरेंच्या बालेकिल्ल्यावरचा थेट हल्ला असेल तर त्याला तटकरे कसे उत्तर देतात, हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

कारण कबड्डीच्या मैदानावर चढाई करणारा खेळाडू प्रतिस्पर्ध्याच्या गोटात शिरला म्हणजे सामना संपत नाही. खरी बाजी तो आपल्या गोटात परतताना ठरवतो. रोह्याच्या राजकीय मैदानात पोटफोडेंची चढाई नेमकी कुणाच्या खात्यात गुण जमा करणार, हे आगामी कालावधीत स्पष्ट होईलच.

………


Related Articles

Back to top button