ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
महाड ते अलिबाग : आंबेडकरी विचारांचा जागर; सामाजिक सप्ताहात विविध जनजागृती उपक्रम
रायगडात व्याख्यान, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिरे व पदयात्रेद्वारे संविधान मूल्यांचा प्रसार; अलिबागमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा रक्तदान उपक्रम

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रायगड जिल्ह्यात ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘सामाजिक सप्ताह’ साजरा करण्यात येत असून, या माध्यमातून आंबेडकरी विचारांचा जागर घडवण्यावर भर देण्यात येत आहे. विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याचा या उपक्रमामागील उद्देश असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जवळ यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात समता सप्ताहाची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी शिक्षण जावळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
गुरुवार दि.९ एप्रिल रोजी महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज येथे सकाळी ११ वाजता प्रमुख कार्यक्रम पार पडणार असून, यामध्ये आंबेडकर यांच्या विचारांवर तसेच ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. याचबरोबर संत गाडगे महाराज यांच्या स्वच्छता व समाजप्रबोधनाच्या कार्यावर मार्गदर्शन होणार असून, विद्यार्थ्यांकडून भारुड आणि लघुनाट्याद्वारे सामाजिक संदेश दिला जाणार आहे. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे प्रतीकात्मक वाटपही करण्यात येणार आहे.
संपूर्ण सप्ताहात स्वच्छता अभियान, जनजागृती शिबिरे, महिला मेळावे आणि विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शुक्रवार दि.१० एप्रिल रोजी अलिबाग येथे स्वच्छता अभियान तर आयटीआय कॉलेजमध्ये मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. शनिवार दि.११ एप्रिल रोजी महात्मा जोतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या समाजकार्यावर व्याख्यान होणार असून सामाजिक समतेचा संदेश अधिक दृढ केला जाणार आहे. रविवार दि.१२ एप्रिल रोजी पनवेल येथे जेष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दि.१३ एप्रिल रोजी खालापूर येथे सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच दिवशी कामोठे, पनवेल येथे महिला मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, अलिबाग येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी किसन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल तसेच रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले हे तिन्ही प्रमुख अधिकारी स्वतः रक्तदान करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली. त्यामुळे या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंगळवार दि.१४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीनिमित्त अलिबाग येथे सकाळी ९ वाजता पदयात्रा काढण्यात येणार असून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय ते डॉ. आंबेडकर पुतळा असा मार्ग असणार आहे. यावेळी संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन केले जाणार आहे. तसेच दुपारी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व उपक्रमांमधून संविधानातील मूल्ये, सामाजिक न्याय आणि समतेचा संदेश समाजात अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
…….




