ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय
शेकापची विचारधारा आणि ‘कंपनी विकू’ विधान; एक वस्तुनिष्ठ विश्लेषण
'मी आणि चित्रलेखा दोघेही आमदार होणार; त्यासाठी कंपनी विकावी लागली तरी चालेल' या वक्तव्यामुळे शेकापच्या विचारधारेवर नव्याने प्रश्न उपस्थित

फडशा
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
आविष्कार देसाई
“मी आणि चित्रलेखा पाटील आम्ही दोघेही आमदार होणार. त्यासाठी एखादी कंपनी विकावी लागली तरी चालेल,” असे माजी आमदार जयंत पाटील यांनी जाहीरपणे म्हटले. या एका वाक्यातून केवळ निवडणुकीची महत्त्वाकांक्षा व्यक्त झाली नाही, तर अनेक दशकांपासून भांडवलशाहीविरोधाचा झेंडा हाती घेतलेल्या पक्षाच्या वैचारिक भूमिकेतील विरोधाभासही समोर आला. अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. माजी आमदार जयंत पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्याने केवळ राजकीय चर्चाच रंगलेली नाही, तर शेतकरी कामगार पक्षाच्या मूळ विचारधारेबाबतही अनेक मूलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत.
शेतकरी कामगार पक्षाची ओळखच डाव्या विचारसरणीची राहिली आहे. कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या शोषणाला भांडवलशाही ही कारणीभूत आहे, उद्योगपती आणि मोठे भांडवलदार समाजातील विषमता वाढवतात, अशी भूमिका या पक्षाने सातत्याने मांडली. कामगारांच्या हक्कांसाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आणि भांडवलदारांविरोधात संघर्ष करणे हीच पक्षाची राजकीय ओळख राहिली. त्यामुळे आज त्याच पक्षाच्या प्रमुख नेत्याने स्वतः उभारलेल्या कंपन्यांपैकी एखादी कंपनी विकून आमदारकी मिळवण्याची तयारी दर्शवणे हा केवळ राजकीय नाही, तर वैचारिक विसंगतीचा विषय ठरतो.

जयंत पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत मोठे नेतृत्व उभे केले, त्याचबरोबर विविध कंपन्या आणि व्यावसायिक उपक्रमही उभारले. वैयक्तिक यश मिळवण्यात काहीही गैर नाही; परंतु जेव्हा एखादा नेता भांडवलशाहीविरोधी विचार मांडतो आणि त्याचवेळी स्वतः मोठ्या उद्योगसाखळीचा भाग बनतो, तेव्हा त्याच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक ठरते. कारण जनतेला शब्द आणि कृती यामधील सुसंगती अपेक्षित असते.
यापूर्वीही जयंत पाटील यांनी विधान परिषदेची मुदत संपल्यानंतर पुन्हा निवडून न आल्याची खंत व्यक्त करताना “पैशाचा घोडेबाजार करूनही यश मिळाले नाही,” असे जाहीर सभेत सांगितले होते. त्या वक्तव्यातून निवडणूक प्रक्रियेत पैशाचे वाढते महत्त्व त्यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केले होते. आता “कंपनी विकून आमदार होऊ” या वक्तव्यामुळे पैशाशिवाय निवडणूक जिंकणे कठीण असल्याची मानसिकता त्यांनी पुन्हा अधोरेखित केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
त्यानंतर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांची सून चित्रलेखा पाटील यांनी अलिबाग-मुरुड मतदारसंघातून निवडणूक लढवली; मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. त्यांचा शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी पराभव केला. यापूर्वी जयंत पाटील स्वतः सक्रिय आमदारकीपासून दूर गेले आणि त्यानंतर घरातील उमेदवारालाही विजय मिळवता आला नाही. सलग दोन मोठ्या पराभवांनी शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वासमोर संघटनात्मक आणि राजकीय आव्हाने उभी राहिली, हे वास्तव नाकारता येणार नाही.
याच पार्श्वभूमीवर वाढदिवसाच्या मंचावर जयंत पाटील यांनी “आम्ही दोघेही आमदार होणारच” असा आत्मविश्वास व्यक्त केला. मात्र त्याच कार्यक्रमात महाविकास आघाडीतील आमदार सतेज (बंटी) पाटील यांची उपस्थिती आणि त्यांच्याकडून भविष्यातील राजकीय बळाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. हा भाग अधिक लक्षवेधी ठरतो. एकेकाळी राज्यभर प्रभाव असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाला आज दुसऱ्या पक्षातील नेत्यांच्या पाठबळाची सार्वजनिक अपेक्षा व्यक्त करावी लागत असेल, तर ती पक्षाच्या स्वतंत्र राजकीय ताकदीत झालेल्या घटेची कबुली मानली जाऊ शकते.
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठा विरोधाभास म्हणजे भांडवलशाहीविरोधी राजकारण करणाऱ्या नेतृत्वाने स्वतःच्या कंपन्यांचा आधार घेऊन सत्ता मिळवण्याची तयारी दर्शवणे. विचारसरणी आणि व्यवहार यांच्यातील अंतर जितके वाढते, तितका कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा विश्वास कमी होण्याचा धोका वाढतो. विचारधारा ही केवळ भाषणापुरती राहिली आणि प्रत्यक्ष राजकारण आर्थिक सामर्थ्यावर उभे राहिले, तर पक्षाची वैचारिक विश्वासार्हता कमकुवत होऊ शकते.
शेतकरी कामगार पक्षाची आजची अवस्था ही केवळ निवडणुकीतील पराभवामुळे निर्माण झालेली नाही.
एकेकाळी राज्याच्या राजकारणात प्रभावी असलेला हा पक्ष कालांतराने संघटनात्मकदृष्ट्या कमकुवत झाला. अनेक निरीक्षकांच्या मते, नेतृत्वाने घेतलेले काही चुकीचे निर्णय, बदलत्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेण्यात आलेले अपयश आणि नेतृत्वाभोवती निर्माण झालेल्या मर्यादित सल्लागारांच्या प्रभावामुळे पक्षाची घसरण वेगाने झाली.
राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात अशी चर्चा रंगताना दिसते की, शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा उभारी द्यायची असेल, तर केवळ दोन आमदार करण्याची भाषा करून चालणार नाही; त्यासाठी सर्वप्रथम नेतृत्वाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. माजी आमदार जयंत पाटील आणि चित्रलेखा पाटील यांच्या अवतीभवती असणारे “चमचे” दूर ठेवावे लागणार आहेत, किंवा “चमचे” बदलावे लागणार आहेत. किंबहुना जे काही ताटात आहे ते स्वतःच्या हाताने खावे लागेल, दुसऱ्यांच्या सांगण्यावर अवलंबून राहून राजकारण चालत नाही. कान हलके ठेवून राजकारण चालत नाही; प्रत्येक माहितीची शहानिशा करूनच निर्णय घ्यावे लागतात. कार्यकर्त्यांचा थेट आवाज ऐकला, सामान्य माणसाशी पुन्हा नाळ जोडली, कार्यकर्ते पदाधिकारी यांचा योग्य सन्मान राखला आणि लोकांच्या प्रती काम करण्याची प्रामाणिक इच्छा दाखवली, तर पक्ष संघटना पुन्हा बळकट होऊ शकते. विश्वास पुन्हा जिंकला, तर शेतकरी कामगार पक्षाचे केवळ दोन आमदार नव्हे, तर वीस आमदार होण्यासही वेळ लागणार नाही.
शेवटी प्रश्न केवळ जयंत पाटील किंवा चित्रलेखा पाटील यांच्या आमदारकीचा नाही. प्रश्न आहे तो शेतकरी कामगार पक्षाच्या मूळ विचारसरणीचा. जर भांडवलशाहीला विरोध करणारे नेतृत्वच आज भांडवलाच्या बळावर राजकीय भविष्य घडवण्याची भाषा करत असेल, तर कार्यकर्ते आणि मतदार यांना विचारण्याचा अधिकार आहे. ही विचारधारेची उत्क्रांती आहे की तडजोड? आणि त्या प्रश्नाचे उत्तर केवळ भाषणातून नव्हे, तर आगामी राजकीय कृतीतून द्यावे लागणार आहे.
शेवटी एवढेच… राजकारणात मतभेद असू शकतात, विचारांवर परखड भाष्यही होऊ शकते; पण व्यक्तीविषयी मनात आदर कायम असतो. माजी आमदार जयंत पाटील यांनी शतायुषी व्हावे, उत्तम आरोग्य लाभावे आणि शेतकरी कामगार पक्षाच्या डाव्या विचारसरणीचा लाल बावटा अधिक जोमाने पुढे न्यावा. जनतेच्या विश्वासाच्या जोरावर पुन्हा सत्तेपर्यंत मजल मारावी, हीच वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक सदिच्छा. कारण शेवटी कोणत्याही पक्षाचा खरा विजय हा पैशाने नव्हे, तर विचार, कार्यकर्ते आणि जनतेच्या विश्वासानेच होत असतो.
……
संपादकीय भूमिका :
कोणत्याही नेत्याचे किंवा पक्षाचे समर्थन अथवा विरोध करणे ही या लेखाची भूमिका नाही. मात्र जेव्हा एखादे सार्वजनिक विधान संबंधित पक्षाच्या जाहीर विचारसरणीशी तुलना करण्याची गरज निर्माण करते, तेव्हा त्या विसंगतीकडे लक्ष वेधणे ही माध्यमांची जबाबदारी असते. हा लेख त्याच जबाबदारीतून, उपलब्ध तथ्ये आणि सार्वजनिक वक्तव्यांच्या आधारे केलेले विश्लेषण आहे.
……




