ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड
वनहक्क कायदा : २० वर्षे… न्याय अजूनही वनात हरवलेला?
२४ फेब्रुवारी वनहक्क जनसुनावणी सकाळी ११ ते सायं. ४.३० यशवंतराव चव्हाण केंद्र, नरिमन पॉईंट, वनहक्कांवर जनतेचा थेट सवाल, कोकणातील ४० ग्रामसभा मांडणार साक्ष

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
दोन दशकांपूर्वी संसदेत मंजूर झालेला वनहक्क कायदा आदिवासींना त्यांच्या पिढीजात जमिनीचा अधिकार देण्यासाठी होता. पण कोकणात आजही हजारो कुटुंबे कागदावरच्या आश्वासनांच्या सावलीत जगत आहेत. दावे नामंजूर, अपील प्रलंबित आणि वनजमिनी मात्र प्रकल्पांसाठी झपाट्याने वळविल्या जात आहेत हा नेमका विकासाचा मॉडेल कोणासाठी?
कोकण विभागातील वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीवर सार्वजनिक जनसुनावणी मंगळवार, २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ४.३० या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे ठिकाण नरिमन पॉईंट, मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्र आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी दिली.
या सुनावणीत तक्रारी ऐकून धोरणात्मक शिफारसी तयार करणाऱ्या ज्युरीमध्ये न्यायमूर्ती अभय ठिपसे (निवृत्त उच्च न्यायालय न्यायाधीश), वसंत पुरके (माजी मंत्री), लक्ष्मीकांत देशमुख (निवृत्त आयएएस अधिकारी व लेखक), उज्ज्वला मसदेकर (माजी प्राध्यापक, कर्वे समाजकार्य विद्यालय) आणि
मीना मेनन (पत्रकार व लेखिका) यांचा समावेश आहे.
जनसुनावणी केवळ कार्यक्रम नाही; ती दोन दशकांच्या अंमलबजावणीचा सार्वजनिक हिशेब आहे. पालघर ते सिंधुदुर्गपर्यंतच्या ग्रामसभांचे प्रतिनिधी “आमचे हक्क कुठे अडकले?” असा थेट सवाल प्रशासनाला करणार आहेत.
धोरणे दिल्ली-मुंबईत बनतात, पण न्याय गावापर्यंत पोहोचत नाही हीच खरी शोकांतिका आहे का?
वनहक्क कायदा कागदापुरताच राहिला आहे का?
आणि जर कायदा आहे, तर हक्क अजूनही वनात का हरवलेले आहेत?
या जनसुनावणीत “जनतेची ज्युरी” प्रशासनाच्या भूमिकेवर बोट ठेवणार असताना, आता खरा प्रश्न असा आहे दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर तरी आदिवासींना त्यांचा हक्क मिळणार की पुन्हा एकदा आश्वासनांचीच पाने उलटली जाणार?




