गणेश मंडप होणार ‘आरोग्य मंडपम’; बाप्पाच्या उत्सवात साथरोगांना ‘नो एंट्री’
रायगडमध्ये ‘धन्वंतरी आरोग्य अभियान’; मंडपांमध्ये विशेष आरोग्य पथके, प्राथमिक उपचारांसह डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधावर भर

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
गणेशोत्सव म्हटला की गर्दी, उत्साह आणि भक्तीचा माहोल; मात्र याच गर्दीतून साथीच्या आजारांना संधी मिळू नये, यासाठी रायगड जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडप केवळ बाप्पाच्या दर्शनाचे केंद्र न राहता ‘आरोग्य मंडप’ म्हणूनही काम करणार आहेत. गणेश मंडपांमध्ये विशेष आरोग्य पथके तैनात करून प्राथमिक उपचार, आरोग्य तपासणी आणि साथरोग प्रतिबंधाबाबत जनजागृती केली जाणार असून डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसह साथीच्या आजारांना ‘नो एंट्री’ देण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे.
कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या काळात मुंबई, पुणे तसेच राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने चाकरमानी रायगडमध्ये दाखल होतात. त्यामुळे बाजारपेठा, एसटी डेपो, सार्वजनिक ठिकाणे आणि गणेश मंडळांच्या परिसरात मोठी गर्दी होते. दुसरीकडे पावसाळी वातावरणामुळे ठिकठिकाणी साचलेले पाणी, अस्वच्छता आणि डासांची वाढ यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया तसेच अतिसार, कावीळ, टायफॉईड आणि लेप्टोस्पायरोसिससारख्या आजारांचा धोका वाढतो. ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ‘धन्वंतरी आरोग्य अभियान’ राबविण्यात येणार आहे.
या अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये तसेच जिल्हा रुग्णालयात आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. वैद्यकीय पथकेही सज्ज ठेवण्यात येणार असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांमध्ये विशेष आरोग्य पथकांची नियुक्ती केली जाणार आहे. या पथकांमार्फत गरजेनुसार प्राथमिक उपचार केले जातील.
गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा, एसटी डेपो आणि गणेश मंडळांच्या परिसरात स्वच्छतेची पाहणी केली जाणार आहे. डासांची पैदास होऊ नये यासाठी आवश्यक त्या ठिकाणी औषध फवारणी केली जाणार असून डेंग्यू व मलेरियाच्या निदानासाठी आवश्यक तपासणी किट उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत.
गणेश मंडळांनाही मंडप परिसरात पाणी साचू न देणे, कचऱ्याची नियमित विल्हेवाट लावणे, स्वच्छता राखणे आणि पिण्याच्या पाण्याची शुद्धता कायम ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित ग्रामपंचायती, नगरपंचायती आणि नगरपालिकांच्या सहकार्याने सार्वजनिक स्वच्छतेवरही विशेष भर दिला जाणार आहे.
ग्रामपंचायत स्तरापासून जिल्हा स्तरापर्यंत आरोग्यसेवक, आशासेविका आणि अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून साथीच्या आजारांची लक्षणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती केली जाणार आहे. गणेश मंडळांनी ध्वनिक्षेपकावरून आरोग्यविषयक संदेश द्यावेत, तसेच मंडप परिसरात जनजागृतीपर फलक लावावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही व्यापक जनजागृती केली जाणार आहे.
नागरिकांनी आणि गणेशोत्सव मंडळांनी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन राजिप अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयेश गोसावी आणि माता बाल संगोपन अधिकारी डॉ. दामोदर मोरे यांनी केले आहे.
….




