ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

दिल्लीतील लाठीच्या धगीतून अलिबागेत “लाल निखारे पेटले”! नीट पेपरफुटीवर शेकाप रस्त्यावर; धर्मेंद्र प्रधान आणि अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
अलिबाग |
दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आणि नीट पेपरफुटी प्रकरणातील कथित निष्क्रियतेविरोधात अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्षाने मंगळवारी आक्रमक एल्गार पुकारला. “विद्यार्थ्यांवर लाठ्या चालवणारे सरकार चालणार नाही”, “शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि गृहमंत्री अमित शाह यांनी तत्काळ राजीनामा द्यावा”, अशा घोषणांनी पीएनपी नाट्यगृह परिसर दणाणून गेला.
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत शेकापच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी, युवक-युवती, विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याची शपथही घेण्यात आली.
यावेळी शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, सुरेश घरत, अनिल पाटील, विजय गिदी, अंजली ठाकूर, अनिल चोपडा, ॲड. परेश देशमुख, ॲड. किशोर हजारे यांच्यासह विविध पक्ष-संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
आंदोलनात बोलताना चित्रलेखा पाटील यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून लाखो विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. मात्र पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे भविष्य उद्ध्वस्त झाले. त्यानंतर न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करून सरकारने लोकशाहीचाच गळा घोटला,” असा आरोप त्यांनी केला.
“शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि गृहमंत्री अमित शाह यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा. शेतकरी कामगार पक्ष विद्यार्थ्यांच्या लढ्यात शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी उभा राहील,” असा इशाराही त्यांनी दिला.
शेकाप महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांनी सरकारवर जोरदार टीका करत तरुणांना संघर्षाचे आवाहन केले.
“देशातील २५ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला आहे. न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या लाठ्या चालतात, पण जबाबदार मंत्र्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. ही लोकशाही नव्हे, हुकूमशाही आहे. तरुणांनो जागे व्हा… रात्र वैऱ्याची आहे,” असे त्या म्हणाल्या.
शेकापचे तालुका चिटणीस सुरेश घरत यांनीही आक्रमक भूमिका घेत, “संविधानाच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर लाठ्या चालवणारे सरकार लोकशाहीला काळिमा फासत आहे. युवक जागा झाला असून अन्यायाविरोधात लढण्याची आणि सत्तेला धडा शिकविण्याची ताकद त्याच्यात आहे,” असे सांगितले.
यावेळी शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. त्यानंतर उपस्थितांनी हातात संविधानाची प्रत घेऊन उद्देशिकेचे सामूहिक वाचन करत संविधानिक मूल्यांचे जतन, लोकशाहीचे संरक्षण आणि सामाजिक न्यायाच्या तत्त्वांप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली.
याप्रसंगी शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य अनिल शांताराम पाटील, शेकाप अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत, शेकाप शेतकरी संघटना तालुका प्रमुख अनिल गोमा पाटील, पंचायत समिती सदस्य अंजली ठाकूर, शेकाप मुरूड तालुका चिटणीस विजय गिदी, अलिबाग नगरपरिषदेचे नगरसेवक अनिल चोपडा, ॲड. परेश देशमुख, ॲड. किशोर हजारे, नागेश कुलकर्णी, काँग्रेसचे आकाश राणे, शेकाप पुरोगामी संघटनाचे तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे, शेकाप तालुका विद्यार्थी संघटना अध्यक्ष वेदांत कंटक, यांच्यासह विविध सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, तरुण-तरुणी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
…..

Related Articles

Back to top button