क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
जलतरणातून सुरुवात; अलिबागचा ‘स्पोर्ट्स व्हिजन २०३०’ आकाराला; रुद्राशी टेमकरची चार सुवर्णपदकांवर मोहोर, तनिष शिंदेची दुहेरी सुवर्णभरारी
८२ जलतरणपटूंचा गौरव; जलतरणानंतर बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरमसह बहुक्रीडा स्पर्धांचा आराखडा

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
अलिबागमध्ये उभारण्यात आलेल्या आधुनिक क्रीडा सुविधांचा उपयोग केवळ स्पर्धा घेण्यासाठी नव्हे, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी व्हावा, या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांना आता अधिक व्यापक स्वरूप मिळत असल्याचे चित्र ‘नगराध्यक्ष चषक’ जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेतून पाहायला मिळाले. जलतरणानंतर बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ तसेच अन्य क्रीडा प्रकारांच्या स्पर्धाही नियमितपणे आयोजित करण्याचा मानस व्यक्त झाल्याने अलिबागचा ‘स्पोर्ट्स व्हिजन २०३०’ आकार घेत असल्याची चर्चा क्रीडावर्तुळात रंगली आहे.

ॲक्वाटिक असोसिएशन ऑफ रायगड आणि स्व. नमिता नाईक क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच अलिबाग नगर परिषदेच्या सहकार्याने आयोजित या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेला रायगडभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रविवारी (ता. १९) दिवसभर झालेल्या स्पर्धांनंतर विविध गटांतील ८२ गुणवंत जलतरणपटूंना पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धा केवळ पदकांसाठी नव्हती; तर रायगडमधील गुणवंत खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी तयार करण्याचा हा प्रयत्न होता. विविध तालुक्यांतील शेकडो जलतरणपटूंनी फ्रीस्टाईल, बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्ट्रोक आणि बटरफ्लाय प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्यातील वाढती क्रीडा गुणवत्ता सिद्ध केली.

खुल्या महिला गटात रुद्राशी टेमकर हिने चारही प्रकारांत वर्चस्व राखत चार सुवर्णपदके पटकावून स्पर्धेची मानकरी ठरली. तर गट-२ (२०१२) मधील तनिष शिंदे याने ५० मीटर फ्रीस्टाईल आणि ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्णपदके, तसेच ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक आणि ५० मीटर बटरफ्लायमध्ये रौप्यपदके जिंकून दमदार कामगिरी केली. यांच्यासह विविध गटांतील अन्य खेळाडूंचाही गौरव करण्यात आला.
पारितोषिक वितरण समारंभाला नगरसेवक अनिल चोपडा, नगरसेवक सागर भगत, नगरसेविका अश्विनी ठोसर, पोलीस अधिकारी किशोर साळे, कर व प्रशासकीय अधिकारी श्रद्धा नवले, कर व प्रशासकीय अधिकारी प्रियांका वाघ, राष्ट्रीय जलतरणपटू व प्रशिक्षक दिलीप वैद्य तसेच प्रशिक्षक दत्ता तरे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पदके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि क्रीडाभावना जोपासण्याचे आवाहन केले. जिंकण्याइतकेच स्वतःला सक्षम खेळाडू म्हणून घडविणे महत्त्वाचे असल्याचा संदेशही त्यांनी दिला.
नगराध्यक्षा अक्षया प्रशांत नाईक आणि वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांच्या पुढाकारातून अलिबागमध्ये उभारलेल्या आधुनिक क्रीडा सुविधांचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक गुणवंत खेळाडूला मिळावा, ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि सातत्याने दर्जेदार स्पर्धा आयोजित व्हाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची भावना क्रीडावर्तुळातून व्यक्त करण्यात आली.

यावेळी प्रशांत नाईक म्हणाले, “केवळ क्रीडा सुविधा उभारणे हा उद्देश नाही. त्या सुविधांमधून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणारे खेळाडू घडले पाहिजेत. प्रत्येक मुलामध्ये क्षमता असते. योग्य प्रशिक्षक, दर्जेदार स्पर्धा आणि सातत्यपूर्ण संधी मिळाल्यास रायगडचे खेळाडू देशभर नाव कमावतील. ‘नगराध्यक्ष चषक’ ही त्या मोठ्या प्रवासाची सुरुवात आहे.”
ते पुढे म्हणाले, “जलतरणाबरोबरच बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ तसेच अन्य वैयक्तिक आणि सांघिक क्रीडा प्रकारांच्या स्पर्धाही नियमितपणे आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. अलिबागमध्ये सर्वसमावेशक क्रीडा संस्कृती निर्माण करून प्रत्येक गुणवंत खेळाडूला संधी उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषद सातत्याने प्रयत्नशील राहील.”

क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण गुंतवणूक, आधुनिक सुविधा आणि विविध खेळांच्या नियमित स्पर्धांचा आराखडा यामुळे अलिबागची ओळख केवळ पर्यटननगरी म्हणून न राहता रायगडच्या भावी राष्ट्रीय खेळाडूंना घडविणाऱ्या बहुक्रीडा केंद्राच्या दिशेने वाटचाल करणारे शहर म्हणून निर्माण होत असल्याचे मत प्रशिक्षक, पालक आणि क्रीडाप्रेमींनी व्यक्त केले.
……




