ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड
अस्मितेच्या पलीकडे उभा राहिलेला देश; रस्त्यावर उतरलेल्या तरुणातून नव्या भारताची सुरुवात?
शिक्षण, रोजगार आणि भवितव्याच्या प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियातून रस्त्यावर येत राष्ट्रीय चर्चेची दिशा बदलली.

अर्थाची सोपी गोष्ट
ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि अर्थविषयांचे गाढे अभ्यासक संजीव चांदोरकर यांच्या लेखणीतून…
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
देशातील शिक्षण क्षेत्राचा ज्वलंत विषय, जो गेली अनेक वर्षे चिखलात रुतून बसला होता, त्याचा गाडा किमान अंशतः का होईना, बाहेर काढल्याबद्दल…
देशातील खऱ्या-खोट्या अस्मिताकेंद्री प्रश्नांपेक्षा राजकीय अर्थव्यवस्थेच्या गाभ्यातील खऱ्या प्रश्नांना पुन्हा अजेंड्यावर आणल्याबद्दल…
गेल्या दोन-अडीच महिन्यांतील घटनांची (आणि त्या निमित्ताने झालेल्या चर्चांची) पुनरुक्ती करण्याची गरज नाही. पण त्या घटना देशातील कोट्यवधी विद्यार्थी-तरुणांच्या मनात गेली अनेक वर्षे खदखदणाऱ्या असंतोषाच्या लाव्ह्यावर पडलेली ठिणगी सिद्ध झाल्या, हे खरे आहे.
गेले एकवीस दिवस देशातील विद्यार्थी-तरुणांचे विश्व या घडामोडींनी ढवळून निघाले. जरी गोदी मीडियाने ठरवून त्याची दखल घेतली नसली, तरीही.
काल, २० जुलै रोजी या विद्यार्थी-तरुणांनी ‘चलो संसद’चा नारा देत संसदेवर मोर्चा काढण्याचे जाहीर केले. त्या आवाहनाला अपेक्षेपेक्षा प्रचंड प्रतिसाद मिळाला. दिल्लीशिवाय देशातील अनेक शहरांत आंदोलने, धरणे, जाहीर सभा असे कार्यक्रम घेण्यात आले.
या सर्व कार्यक्रमांत सहभागी झालेल्यांची एकत्रित संख्या काही लाख असू शकते. फार पूर्वतयारी नाही, साधनसामुग्री नाही; तरीदेखील हे घडले! अनेक अर्थांनी ही खूप मोठी आणि विश्वास देणारी घटना आहे.
कालच्या एका दिवसातील दिल्लीतील जंतर-मंतरवरीलच नव्हे, तर संपूर्ण देशातील विद्यार्थी-तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हेच सांगतो की, देशातील विद्यार्थी आणि तरुण त्यांच्या जीवनाची, भवितव्याची जी काही हेळसांड सुरू आहे, त्यामुळे प्रचंड अस्वस्थ आहेत. त्यासाठी ते सोशल मीडियाच्या बाहेर येऊन रस्त्यावर उतरण्यास तयार आहेत. शासनाच्या दादागिरीला सामोरे जाण्यासही तयार आहेत.
हा संदेश गेल्या दोन-अडीच महिन्यांत धिम्या गतीने उभ्या राहिलेल्या आंदोलनाचा निचोड आहे.
संपूर्ण आंदोलनाबद्दल माझीही काही क्रिटिकल मते होती, आहेत. पण मनात कोणताही किंतू न बाळगता घडलेल्या प्रक्रियेचे स्वागत केले पाहिजे.
सोशल मीडियावरील निषेधाचे ट्विटर स्टॉर्म नवीन नाहीत. ती वादळे उठतात आणि शमतातदेखील. पण यावेळी तरुण सोशल मीडियावर निषेध नोंदवून थांबले नाहीत. अभिजीत दीपके यांनी पुढाकार घेऊन ‘कॉकरोच जनता पार्टी’ स्थापन केली. दिल्लीत जंतर-मंतरवर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम जाहीर केला.
त्यानंतर त्या आंदोलनात सोनम वांगचुक यांनी सक्रिय सहभाग घेण्याचे जाहीर केले आणि आंदोलनाचा कार्यक्रम वेगळ्याच उंचीवर गेला. जंतर-मंतरवर वांगचुक यांनी आमरण उपोषण सुरू केले. त्यात डाव्या आणि आंबेडकरवादी पक्ष-संघटनांशी संबंधित विद्यार्थी-तरुणांच्या संघटना हिरीरीने सहभागी झाल्या. त्या संघटनांतील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी वांगचुक यांच्या बरोबर उपोषणात आपल्या जीवाची बाजी लावली.
देशाप्रती आणि समाजाप्रती काहीएक बांधिलकी मानणाऱ्या निवडक साहित्यिक, पत्रकार, कलावंतांनी प्रत्यक्ष जाऊन किंवा विविध व्यासपीठांवरून पाठिंबा दिला. भाजप वगळता जवळपास देशातील प्रत्येक राजकीय पक्षाने पाठिंबा दिला. या सर्वांनी राजकीय परिपक्वता दाखवली आहे.
कोणत्याही देशासाठी शिक्षण क्षेत्राचे स्थान आणि महत्त्व एकमेवाद्वितीय आहे. व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय कोणत्याही दृष्टिकोनातून पाहिले, तरी त्यातून देशाचे, समाजाचे आणि अर्थव्यवस्थेचे भवितव्य ठरत असते. ही धिम्या गतीने उलगडत जाणारी दीर्घकालीन प्रक्रिया आहे.
ऑल इंडिया सर्व्हे ऑन हायर एज्युकेशननुसार, देशात आजच्या घडीला साडेचार कोटी मुले-मुली उच्च शिक्षण घेत आहेत. त्यात देशातील बॉटम ऑफ द पिरॅमिडमधील कुटुंबांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सतत वाढत आहे. हा आकडा हृदयात स्वप्ने आणि आकांक्षा घेऊन प्रौढ होणाऱ्या तरुणांचा आहे. त्यात दरवर्षी घट न होता तो वाढतच आहे.
हे आंदोलन जरी उच्च शिक्षण घेणाऱ्या आणि स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुरू केले असले, तरी त्या निमित्ताने एकूणच शिक्षण क्षेत्रातील अनेक गंभीर प्रश्न ऐरणीवर आले पाहिजेत. अनेक वर्षांच्या दुर्लक्षामुळे त्यांचा बॅकलॉग प्रचंड आहे.
मोठी यादी करता येईल. देशाच्या जीडीपीच्या किमान सहा टक्के खर्च शिक्षण क्षेत्रावर व्हावा, असा निकष असताना दरवर्षी दोन-तीन टक्क्यांपेक्षा जास्त खर्च होत नाही. फक्त एक टक्का वाढ केली, तरी तीन लाख कोटी रुपये उपलब्ध होऊ शकतात. देशात फक्त गेल्या दहा वर्षांत एक लाख शाळा बंद पडल्या आहेत. शिक्षण क्षेत्राचे लाज वाटावी इतके व्यापारीकरण झाले आहे. शिक्षण हे काही end in itself नाही आणि नसले पाहिजे. त्याचा थेट संबंध रोजगार आणि बेरोजगारीशी आहे. देशात दरवर्षी १४० लाख तरुण रोजगार क्षेत्रात नव्याने प्रवेश करतात, तर रोजगार जेमतेम २० ते ३० लाखच निर्माण होतात.
दोन-अडीच महिन्यांनंतर हे आंदोलन निश्चितच एका मैलाच्या दगडावर येऊन पोहोचले आहे. हे असेच एका सरळ रेषेत सुरू राहू शकणार नाही, हे उघड आहे.
पण यातून संपूर्ण देशात जी ढवळणूक झाली आहे, त्यातून जी ऊर्जा तयार झाली आहे, विद्यार्थी-तरुणांमध्ये जी जागृती निर्माण झाली आहे, ती खूप मोलाची आहे. कारण हेच विद्यार्थी-तरुण या शतकातील भारत आहेत. त्यांना कोणताही पर्याय नाही. ती ऊर्जा देशातील एकूणच शिक्षण क्षेत्र अधिक विद्यार्थी-केंद्री होण्यासाठी आणि शासनाला सर्वार्थाने अधिक जबाबदार बनवण्यासाठी कामी येईल, अशी आशा आहे.
……



