ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
“पावसाळ्यात गढूळ पाणी पाजले, आता तरी शुद्ध पाणी द्या” — उमटे धरण संघर्ष ग्रुपची मागणी

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग : तालुक्यातील उमटे धरणावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी द्यावे, यासाठी उमटे धरण संघर्ष ग्रुपच्या वतीने अँड. राकेश पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता यांना लेखी निवेदन दिले.
या निवेदनात नमूद केले आहे की, उमटे धरणावर ४४ गावे व ३३ आदिवासी वाड्या अवलंबून आहेत. सन २०२४ मध्ये स्थानिक सामाजिक संस्थांनी गाळ काढण्याचे काम केले असले तरी संबंधित विभागाचा एकही अधिकारी धरणावर फिरकला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अँड. पाटील यांनी सांगितले की,
“पावसाळ्यात दरवर्षी गढूळ पाणीच पाजले जाते. मात्र आता पावसाळा संपत आला तरी धरणातून अजूनही मातीमिश्रित पाणीच येत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून धरणाजवळ बसवलेला जलशुद्धीकरण प्रकल्प नावालाच आहे. जिल्हा परिषद जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर ढकलते, त्यामुळे आम्ही थेट मुख्य मालक असलेल्या कार्यकारी अभियंत्यांनाच अर्ज दिला आहे.”
संघर्ष ग्रुपने यावेळी स्पष्ट केले की, उमटे धरणावर अवलंबून असलेल्या हजारो नागरिकांना शुद्ध पाणी मिळवून देणे हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे, आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.




