ताज्या बातम्यामनोरंजनमुंबईरायगड

अलिबागमध्ये रंगणार ‘ऑल द बेस्ट’ नाट्यप्रयोग; नाट्यरसिकांमध्ये उत्सुकता शिगेला


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

अलिबाग  |

मराठी रंगभूमीतील लोकप्रिय विनोदी नाटक ‘ऑल द बेस्ट’चा प्रयोग अलिबाग शहरात रंगणार आहे. पीएनपी नाट्यगृह येथे हा प्रयोग शुक्रवार, २० मार्च रोजी रात्री ९.३० वाजता सादर केला जाणार असून, नाट्यरसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

5000 प्रयोगांचा टप्पा गाठण्याच्या उंबरठ्यावर असलेले हे नाटक मराठी रंगभूमीसाठी एक मोठा आणि दुर्मिळ क्षण  मानला जात आहे. अलिबाग मधील प्रयोगासाठी रसिक प्रेक्षकांची मोठी गर्दी अपेक्षित असून, नाट्यगृह गच्च भरण्याची शक्यता आहे. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन देवेंद्र पेम यांनी केले असून, प्रेक्षकांना दर्जेदार मनोरंजनाची हमी दिली जाते. कलाकारांच्या दमदार अभिनयाला आणि विनोदी सादरीकरणाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या नाटकात मनमीत पेम, मयुरेश पेम, निखिल चव्हाण आणि जुई बेंडखळे हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. प्रेक्षकांना खळखळून हसवणारे आणि हलक्याफुलक्या शैलीत सादर होणारे हे नाटक अनेक वर्षांपासून रंगभूमीवर लोकप्रिय ठरले आहे.

याच नाटकाच्या मूळ संचात भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर आणि संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी मुख्य भूमिका साकारून या नाटकाला अफाट लोकप्रियता मिळवून दिली होती.

कार्यक्रमादरम्यान नाटकातील कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांचा विशेष सत्कारही करण्यात येणार आहे. उपस्थित मान्यवरांकडून या यशस्वी प्रवासाचे कौतुक होण्याची शक्यता आहे.
सुमारे पंधरा वर्षांपूर्वी अलिबागमध्ये याच नाटकाचा प्रयोग झाला होता. त्यामध्ये वैभव तत्ववादी, मयुरेश पेम, आदिनाथ कोठारे आणि मनवा नाईक यांनी भूमिका साकारली होती. आता तोच विनोदी मनोरंजनाचा धमाका पंधरा वर्षांनी प्रेक्षक पुन्हा अनुभवणार आहेत.
“प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच हा टप्पा गाठता आला,” अशी भावना कलाकारांनी व्यक्त केली. तिकीट दर: ₹५००, ₹४००, ₹३००
ऑनलाइन बुकिंग: BookMyShow वर उपलब्ध
फोन बुकिंग: संदीप गोठिवरेकर
दरम्यान, अलिबागसारख्या शहरात अशा प्रकारचा भव्य आणि ऐतिहासिक सोहळा पार पडणे ही स्थानिक कला आणि संस्कृतीसाठी अभिमानाची बाब ठरत असून, नाट्यप्रेमींसाठी हा एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.


Related Articles

Back to top button