ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
वय अवघे २३… पण लढाई संपूर्ण रायगडच्या आरोग्य हक्कासाठी; जिल्हा रुग्णालय-मेडिकल कॉलेजच्या संलग्नतेच्या प्रश्नावर तरुण नगराध्यक्षा अक्षया नाईक उंडे मैदानात
दुरवस्थेची प्रत्यक्ष पाहणी, अधिकाऱ्यांना जाब, जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन; 'रुग्णालय स्थलांतरित करायचे नाही, उभे करायचे' असा स्पष्ट संदेश

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
जिल्हा रुग्णालयाची इमारत धोकादायक, महत्त्वाचे विभाग स्थलांतराच्या उंबरठ्यावर आणि रायगडच्या पहिल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह! अशा गंभीर परिस्थितीत प्रशासनाच्या निर्णयाची वाट न पाहता वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी अलिबागच्या तरुण नगराध्यक्षा अक्षया नाईक उंडे यांनी थेट मैदानात उतरून लढाईची भूमिका घेतली आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन देत त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “अलिबागचे जिल्हा रुग्णालय आणि त्याची ओळख हिरावून घेणारा कोणताही निर्णय रायगडकर सहन करणार नाहीत.”
यासंदर्भात नगराध्यक्षा अक्षया नाईक-उंडे यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक या दोन्ही प्रमुख प्रशासकीय यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करून अलिबाग जिल्हा रुग्णालयातील महत्त्वाचे विभाग जिल्ह्याबाहेर स्थलांतरित न करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती केली आहे. मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष करून सकारात्मक निर्णय न घेतल्यास नागरिक, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटनांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.

पाहणी दरम्यान रुग्णालयाच्या इमारतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याचे, अनेक ठिकाणी धोकादायक अवस्था निर्माण झाल्याचे तसेच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र समोर आले. काही कर्मचारी आणि परिचारिकांकडून नागरिकांशी उद्धट भाषेत वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारीही नगराध्यक्षांच्या निदर्शनास आल्या. यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, सरकारी रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, अशी भूमिका मांडली.

जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) जिल्हा रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील शस्त्रक्रिया विभाग तसेच पी.एम.सी. आणि के.एम.सी. वॉर्ड असलेली इमारत धोकादायक असल्याचे निदर्शनास आणले आहे. रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे विभाग तात्पुरते सुरक्षित इमारतीत हलविण्याची आवश्यकता असल्यास त्याला कोणताही विरोध नाही. मात्र या विभागांचे पेण अथवा पनवेल येथे स्थलांतर करण्याचा कोणताही निर्णय स्वीकारला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असून अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा, तळा, रोहा तसेच किनारपट्टी आणि ग्रामीण भागातील हजारो नागरिक उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयावर अवलंबून आहेत. महत्त्वाचे विभाग पेण किंवा पनवेल येथे हलविल्यास गरीब, ज्येष्ठ नागरिक, महिला, अपघातग्रस्त आणि गंभीर रुग्णांना अतिरिक्त प्रवास, आर्थिक भार आणि वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

नगराध्यक्षांनी प्रशासनाला पर्यायही सुचविला आहे. शस्त्रक्रिया विभाग, पी.एम.सी. आणि के.एम.सी. वॉर्ड अलिबागमधीलच सुरक्षित व सुस्थितीत असलेल्या इमारतीत तात्पुरते स्थलांतरित करावेत. त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयाच्या नवीन, आधुनिक आणि सर्व सुविधायुक्त इमारतीसाठी तातडीने कार्यवाही सुरू करावी, जेणेकरून रायगडकरांना अखंडित आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळू शकेल, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयाला रायगडच्या पहिल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची संलग्नता देण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता टिकवण्यासाठी मेडिकल कॉलेज आणि संलग्न जिल्हा रुग्णालय यांचे एकत्रित कार्य करणे अत्यावश्यक असते. महत्त्वाचे विभाग पेण अथवा पनवेल येथे स्थलांतरित झाल्यास विद्यार्थ्यांचे क्लिनिकल प्रशिक्षण, इंटर्नशिप, प्राध्यापकांचे अध्यापन, रुग्णसेवा आणि शैक्षणिक समन्वयावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ रुग्णालयाच्या स्थलांतराचा नसून रायगडच्या वैद्यकीय शिक्षणाच्या भवितव्याचा आणि जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेच्या गुणवत्तेचाही आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक या दोन्ही प्रमुख प्रशासकीय यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंतीही नगराध्यक्षांनी केली आहे. अन्यथा हा प्रश्न केवळ एका रुग्णालयाचा न राहता रायगडच्या जनतेच्या आरोग्य हक्काचा प्रश्न बनणार असून, नागरिक, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटनांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

वयाने अवघ्या २३ वर्षांच्या असल्या तरी कार्यालयात बसून आदेश देण्याऐवजी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन जनतेच्या प्रश्नासाठी प्रशासनाला जाब विचारण्याची कार्यपद्धती नगराध्यक्ष अक्षया नाईक उंडे यांनी या निमित्ताने दाखवून दिली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न आता केवळ आरोग्य विभागाचा न राहता रायगडच्या आरोग्य हक्काचा आणि जिल्हा मुख्यालयाच्या अस्तित्वाचा प्रश्न बनला असून, प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
……



