क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
कष्ट आणि कौशल्याची कमाल रायगडचा आर्यन देशमुख राज्य संघात कुचबिहारी स्पर्धा खेळण्यात सज्ज

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
क्रीडा प्रतिनिधी
रायगड : रायगड जिल्ह्याचा उदयोन्मुख क्रिकेटपटू आर्यन जितेंद्र देशमुख याची महाराष्ट्राच्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या राज्य संघात निवड झाली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने नुकताच जाहीर केलेल्या अंतिम १५ खेळाडूंच्या संघात रायगडचा हा धडाकेबाज डावखुरा फलंदाज स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला.

आर्यन सध्या रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या एकोणीस वर्षाखालील संघाचा कर्णधार असून, तो चॅम्पियन्स क्रिकेट अकॅडमी खारघरकडून खेळतो. निवड झाल्यानंतर आनंद व्यक्त करताना आर्यनने सांगितले की, “या यशात माझ्या पालकांचा आणि प्रशिक्षकांचा मोठा वाटा आहे.” त्याचे वडील जितेंद्र देशमुख स्वतः त्याला प्रशिक्षण देतात, तर अकॅडमीतील प्रशिक्षक आकाश पटारिया, सुनील सरगर आणि रोशन अडे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
एमसीएच्या आंतरजिल्हा एकोणीस वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत आर्यनने उत्कृष्ट कामगिरी केली होती. निवड चाचणी शिबिरात त्याने तब्बल ४०० हून अधिक धावा करून सर्वांचे लक्ष वेधले आणि राज्य संघात स्थान निश्चित केले.

दरम्यान, बीसीसीआयतर्फे आयोजित कुचबिहार एकदिवसीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ उद्या रांचीकडे रवाना होणार आहे. आर्यनच्या निवडीमुळे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील आणि सचिव प्रदीप नाईक यांनी आर्यनचे अभिनंदन करताना सांगितले की, “रायगडमधील खेळाडूंमध्ये अपार गुणवत्ता आहे. योग्य प्रशिक्षण आणि व्यासपीठ मिळाल्यास ते राज्य व राष्ट्रीय पातळीवर नक्कीच चमकतील.”
असोसिएशनच्या वतीने आगामी हंगामात विविध वयोगटांसाठी अधिकाधिक स्पर्धा, प्रशिक्षण शिबिरे आणि ‘टॅलेंट हंट’ कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
आर्यन देशमुखच्या निवडीबद्दल जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, प्रशिक्षक आणि क्रिकेटप्रेमींनी त्याला शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.




