ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय
रायगडमध्ये कॅश बॉम्ब नव्हे, शब्दबॉम्बचा स्फोट — सत्य हरवलय, अहंकार जिंकतोय! आरोपांच्या रणधुमाळीत मुद्दे चिरडले गेले; रायगडचं राजकारण भरकटलं!

फडशा
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
आविष्कार देसाई
रायगडच्या राजकारणात सध्या सत्याचा शोध नव्हे, तर शब्दांची रणधुमाळी सुरू आहे. ‘कॅश बॉम्ब’ या नावाखाली सुरू झालेला वाद भ्रष्टाचार उघड करण्यासाठी होता की राजकीय वातावरण पेटवण्यासाठी, हा प्रश्नच आता केंद्रस्थानी राहिलेला नाही. कारण हा संघर्ष आता मुद्द्यांमधून निसटून थेट वैयक्तिक आकस, राजकीय अहंकार आणि प्रतिमा उद्ध्वस्त करण्याच्या स्पर्धेत बदललेला दिसतो.
लोकशाहीत आरोप होतील, प्रश्न विचारले जातील, सत्ताधाऱ्यांना जाब विचारला जाईल हे अपेक्षितच. पण जेव्हा आरोप तपासाआधीच निकाल देणारे, आणि भाषा न्यायालयापेक्षा गल्लीच्या पातळीवर जाणारी असेल, तेव्हा त्या संघर्षाचा उद्देश संशयास्पद ठरतो.
शब्दांची मर्यादा आधी विरोधकांनीच ओलांडली
शिवसेना (युबीटी)चे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांनी मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्यावर आरोप करताना राजकीय टीका आणि वैयक्तिक हल्ले यातील सीमारेषा स्पष्टपणे पुसून टाकली. “गुन्हे दाखल”, “चीटर”, “जनतेची फसवणूक करणारे” अशा शब्दांत थेट व्यक्तीगत आरोप करण्यात आले. त्याला धार देण्यासाठी तथाकथित ‘कॅश बॉम्ब’चे व्हिडिओ अधिवेशन कालावधीत सादर करण्यात आले.

हा प्रकार म्हणजे तपास यंत्रणांवर विश्वास नसल्याचे लक्षण आहे की राजकीय दबावाखाली सत्य बाहेर काढण्याचा दावा, हा प्रश्न उभा राहतो. कारण पुरावे असतील तर ते तपास यंत्रणांकडे द्यायचे असतात; सभागृहात किंवा पत्रकार परिषदेत न्यायाधीश बनून निकाल जाहीर करायचा नसतो. त्यामुळे हा सगळा प्रकार राजकारण कमी आणि रियालिटी शो अधिक वाटावा, अशी स्थिती निर्माण झाली.
स्वाभाविक, पण भाषेची घसरण धोकादायक
अर्थात, अशा थेट आणि आक्रमक आरोपांनंतर सत्ताधाऱ्यांकडून तीव्र प्रत्युत्तर येणे हे राजकीय वास्तवात पूर्णपणे स्वाभाविक आहे. आमदार महेंद्र दळवी यांनी “पुरावे द्या, मी आमदारकीचा राजीनामा देतो” असे खुले आव्हान दिले. हे वक्तव्य आत्मविश्वासाचे प्रतीक मानायचे की राजकीय आव्हान म्हणून पाहायचे, हे तपासातूनच स्पष्ट होईल. मात्र, त्याच वेळी चित्रलेखा पाटील यांचं कुटुंब मी राजकारणातून हद्दपार केलं आहे. त्यांच्या कुटुंबातच दोन गट पडले आहेत. वन पार्टी, टू पार्टी; त्यातील काही थेट भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये. सुपारी घेऊन अशी वक्तव्य करणं योग्य नाही. विधानसभा निवडणुकीत मी त्यांचा पराभव केला आहे. जनमानसामध्ये त्यांची किंमत शून्य आहे. मला असं वाटतं त्या ड्रग्ज घेऊन बोलत आहेत,” असे खळबळजनक वक्तव्य शिवसेना अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी करून त्यांनीही वाद मुद्द्यांऐवजी चिखलात नेला, हे वास्तव नाकारता येत नाही. आरोपांना उत्तर देताना जर आरोपांच्या पातळीपेक्षा खाली उतरावे लागले, तर ते उत्तर कमकुवत ठरते. राजकीयदृष्ट्याही आणि नैतिकदृष्ट्याही.

दोन्ही बाजूंनी घसरलेली नैतिक उंची
या संपूर्ण संघर्षात सर्वात कटू आणि धक्कादायक सत्य म्हणजे, एकही बाजू नैतिक उंचीवर उभी राहिलेली नाही. विरोधकांनी आरोप करताना संयम सोडला, तर सत्ताधाऱ्यांनी प्रत्युत्तर देताना प्रतिष्ठा विसरली. परिणामी, भ्रष्टाचार आहे की नाही, व्हिडिओ खरे आहेत की बनावट हे प्रश्न मागे पडले. जनतेसमोर पुढे आला तो फक्त एकच मुद्दा तो म्हणजे, कोण जास्त आरडाओरडा करतोय, कोणाची भाषा अधिक खालच्या पातळीवर गेली? ही स्थिती लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. कारण अशा वेळी सत्य नव्हे, तर आवाज जिंकतो.
रायगडचे राजकारण: संघर्ष जुना, पण स्वरूप अधिक घातक
रायगड जिल्ह्याचे राजकारण हे शेकाप विरुद्ध शिवसेना या संघर्षासाठी ओळखले जात आहे. मात्र आता त्यात शिवसेना (युबीटी) विरुद्ध सत्ताधारी शिवसेना असा त्रिकोणी संघर्ष निर्माण झाला आहे. त्यामुळे ‘कॅश बॉम्ब’ हा केवळ मुद्दा राहिलेला नाही, तर तो राजकीय स्फोट घडवण्यासाठीचा ट्रिगर ठरतोय. या स्फोटात उडत आहेत त्या नोटा नाहीत,
उडत आहेत, ती जबाबदारी, संयम आणि लोकशाहीची मूल्ये.

जनता: कायमच बळीचा बकरा
या सगळ्या शब्दयुद्धात सर्वात मोठा बळी ठरतेय ती जनता. विकास, शेतकरी, रोजगार, पाणी, महागाई, आरोग्य हे प्रश्न कुठेच चर्चेत नाहीत. समोर दिसतोय तो फक्त आरोपांचा धूर, अहंकाराचा स्फोट आणि शब्दांचा प्रचंड आवाज. राजकारण जनतेसाठी असते की जनतेवर राज्य करण्यासाठी, हा मूलभूत प्रश्नच या वादात हरवून गेला आहे.
आरोप खरे असतील तर तपास होऊ द्या, पुरावे समोर येऊ द्या. आरोप खोटे असतील तर जबाबदारी ठरवा, राजकीय किंमत मोजू द्या. पण तोपर्यंत राजकारण जर शब्दबॉम्बवर चालणार असेल, तर ‘कॅश बॉम्ब’चा सत्याशी काहीही संबंध उरणार नाही हेही तितकेच खरे आहे.
रायगडमध्ये आज राजकारण तापलेले नाही,
ते भरकटलेले आहे आणि भरकटलेले राजकारण हे लोकशाहीसाठी सर्वात धोकादायक असते. याचा विसर कोणत्याही व्यवस्थेने पडू देता कामा नये इतकीच अपेक्षा आहे.
—




