स्वराज्याची लढाई इथूनच सुरू!” — सुतारवाडीत जिल्हा कार्यकारिणीचा निर्धार

रायगड : जिल्ह्यात आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणसंग्राम आता प्रत्यक्षात सुरू झाला असून, सुतारवाडी येथे आज झालेली जिल्हा कार्यकारिणीची बैठक हा त्या लढाईचा पहिला मजबूत शंखनाद ठरली. पक्ष संघटन बळकट करण्यासाठी आणि प्रत्येक गावात ताकद उभी करण्यासाठी रणनीती आखण्यात आली.
या बैठकीत संघटनेला आक्रमकतेने पुढे नेण्यासाठी नवे दमदार चेहरे नेतृत्वात आणण्यात आले. प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशाने हनुमंत जगताप यांची प्रदेश सरचिटणीस आणि सुधाकर घारे यांची रायगड जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करत नेतृत्वात ताजेपणा आणि अनुभवी दिशा देण्यात आली. हे दोन्ही निर्णय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णायक ठरणार आहेत, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
“ही निवडणूक जिंकायचीच आहे!” — असा निर्धार सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. गटशाखा ते जिल्हा स्तरापर्यंत संघटन उभं करणं, कार्यकर्त्यांचा थेट संवाद वाढवणं, आणि सत्ताधाऱ्यांच्या अपयशांवर थेट हल्लाबोल करणं या बाबींवर बैठकीत ठोस चर्चा झाली.
माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती बैठकीच्या गांभीर्याला साजेशी होती. या बैठकीनंतर रायगडमधील राजकीय समीकरणं बदलणार, अशी भावना उपस्थितांमध्ये स्पष्ट दिसून आली.