राज–उद्धव युतीचा धसका : भाजपची रणनीती कोलमडली, मुंबई गमावण्याची भीती; यू-टर्नमागचं खरं कारण उघड

फडशा
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
आविष्कार देसाई
मुंबई : महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा मुखवटा आता गळून पडतो आहे. राज ठाकरे–उद्धव ठाकरे युती जाहीर होताच भाजपची तथाकथित ‘मास्टर स्ट्रॅटेजी’ कोसळली आणि सत्ता मिळवण्यासाठी भाजपने सुरू केलेली धडपड उघडपणे दिसू लागली आहे. आजची परिस्थिती स्पष्ट सांगते भाजपला विरोधकांची नाही, तर मराठी मतदारांची खरी भीती वाटते आहे.
आतापर्यंत मुंबईत भाजपने एकच खेळ खेळला तो म्हणजे शिवसेना फोडा, मराठी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करा आणि सत्ता आपल्या हातात केंद्रित ठेवा. मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपचा हा फॉर्म्युला फेल ठरतो आहे. मराठी मतदार पुन्हा एकवटण्याची शक्यता निर्माण झाली आणि त्यामुळे भाजपचा पाया हादरला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांपैकी भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी सुरुवातीला फक्त 52 जागांचा प्रस्ताव दिला. हा आकडा म्हणजे केवळ जागावाटप नव्हतं, तर थेट संदेश होता “तुम्ही आमच्या कृपेवर आहात.” शिंदे गटाला मुद्दाम लहान ठेवायचं, त्यांना केवळ उपयोगापुरतं वापरायचं आणि खरी सत्ता स्वतःकडेच ठेवायची हीच भाजपची मूळ चाल होती.

मात्र राज–उद्धव युतीची घोषणा होताच भाजपच्या गोटात खळबळ उडाली. मराठी मतदार एकत्र आले, तर शिंदे गटही हातातून जाऊ शकतो आणि भाजप मुंबईत एकटा पडू शकतो, ही भीती स्पष्ट झाली. म्हणूनच भाजपने घाईघाईने 52 वरून 70 जागांचा यू-टर्न घेतला. हा बदल ताकदीचा नव्हे, तर भीतीची कबुली होती.
तरीही भाजपचा खरा डाव संपलेला नाही. 70 जागांचा प्रस्ताव देताना भाजप जणू उपकार करत असल्याचा आव आणतो आहे. प्रत्यक्षात शिंदे गटाला 100 जागा देण्यास नकार देत त्यांना मर्यादित ठेवण्याचाच प्रयत्न सुरू आहे. स्वतःकडे जास्त वॉर्ड राखायचे, सत्ता आपल्या हातात ठेवायची आणि पराभव झाला तर दोष मित्रपक्षावर ढकलायचा हा भाजपचा जुना, ओळखीचा पण घातक डाव पुन्हा एकदा समोर येतो आहे.
आज भाजपच्या गोटात एकच चर्चा सुरू आहे. “मराठी मतदार जर एकत्र आले, तर आपली मुंबई हातातून जाणार का?” म्हणूनच कधी शिंदे गटाला जवळ घेतलं जातं, कधी त्यांनाच कमी लेखलं जातं, तर कधी जागावाटपाचा तिढा जाणीवपूर्वक जिवंत ठेवला जातो. ही रणनीती नाही, ही सत्ता मिळवण्यासाठीची तडफड आहे.
संपूर्ण चित्र पाहता एक गोष्ट स्पष्ट होते. भाजप मुंबईकडे केवळ सत्तेच्या केंद्र म्हणून पाहतो, मराठी अस्मितेला गरजेनुसार वापरतो आणि मित्रपक्षांना कायम दुय्यम वागणूक देतो. राज–उद्धव युतीनंतर ही मानसिकता उघडी पडली आहे. त्यामुळे मुंबईची ही लढाई आता भाजप विरुद्ध विरोधक अशी राहिलेली नाही, तर ती भाजपच्या सत्तालोभ विरुद्ध मुंबईकरांच्या अस्मितेची थेट लढाई बनत चालली आहे.
……




