“३ तास सांगितलं… पण काम तर ३५ मिनिटांतच झालं रे!”
मुंबई–पुणे महामार्गावरील आजीवली–भातान २२ केव्ही वीज वाहिनी विलगीकरणाचे काम पूर्ण

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
पनवेल : आर.डी.एस.एस. योजनेअंतर्गत मंजूर असलेले आजीवली–भातान २२ केव्ही वीज वाहिनी विलगीकरणाचे काम दिनांक १६ सप्टेंबर रोजी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. यामुळे परिसरातील ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित होणार आहे.

कामाच्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे महामार्ग पनवेलजवळ दुपारी २ ते ३ या वेळेत वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. प्रत्यक्ष कामासाठी तीन ते चार तासांचा अंदाज होता; मात्र काटेकोर नियोजन व कर्मचारी वर्गाच्या परिश्रमामुळे हे काम अवघ्या ३५ मिनिटांत पूर्ण झाले. परिणामी महामार्गावरील वाहतूक तत्काळ सुरळीत करण्यात आली.

या कामावेळी उपकार्यकारी अभियंता एम. बी. राख, सहाय्यक अभियंता विनय महाडिक, रहमान अत्तार व पनवेल शाखेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. मुख्य अभियंता (भांडुप परिमंडल) संजय पाटील, अधीक्षक अभियंता (पेण मंडळ) धनराज बिक्कड व कार्यकारी अभियंता शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशस्वी अंमलबजावणीस वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शेंडगे, पोलीस निरीक्षक रोंगे व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. सदर काम गोपाला इंटरप्रायझेस या एजन्सीच्या मदतीने पूर्ण झाले.




