केवनाळे गावाच्या पुनर्वसन आराखड्यात पाणीपुरवठा हा प्रमुख मुद्दा

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
मुंबई : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील केवनाळे गावाच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाच्या आराखड्यात पाणीपुरवठा, रस्ते, वीजपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांच्या उभारणीवर विशेष भर देण्यात येणार आहे. आज मंत्रालयात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस रायगडचे खासदार सुनील तटकरे उपस्थित होते. त्यांनी केवनाळे गावाच्या पुनर्वसनासाठी सक्रिय पुढाकार घेतला असून, नागरिकांच्या मागण्या, पुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा आणि आराखड्याच्या अंमलबजावणीसंदर्भात महत्त्वाच्या सूचना दिल्या.
बैठकीला मदत व पुनर्वसन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, रायगड-अलिबागचे जिल्हाधिकारी तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
जुलै २०२१ मध्ये रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील केवनाळे आणि सुतारवाडी या गावांमध्ये दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत ११ लोकांचा मृत्यू झाला, तर १३ लोक जखमी झाले होते. अतिवृष्टीमुळे ही दरड कोसळली होती. त्यानंतर मदत आणि बचाव कार्य तत्काळ सुरू करण्यात आले होते.
दरम्यान, अतिवृष्टीमुळेच महाड तालुक्यातील तळिये गावात दरड कोसळून ४९ जणांचा मृत्यू झाला होता, तर १२ जण जखमी झाले आणि ८० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यांना बेपत्ता घोषित करण्यात आले होते.
या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर, प्रभावित गावांच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न वेगाने सुरू असून, केवनाळे गावाच्या पुनर्वसन आराखड्यात पाणीपुरवठा आणि इतर सुविधांना प्राधान्य देण्यावर भर दिला जात आहे.




