ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड
समुद्रात जाणारा प्रत्येक थेंब अलीबागच्या भविष्यासाठी!; ‘टँकरमुक्त अलीबाग’च्या ध्येयाने ॲड. अंकित बंगेरा यांची धरणासाठी शासनाकडे मागणी
खंडाळे-रुळे धरणाचा प्रस्ताव महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर; "आजची तहान नव्हे, पुढील पिढ्यांची जलसुरक्षा" हा विकासाचा केंद्रबिंदू

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
अलीबागला दरवर्षी भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर टँकर आणि तात्पुरत्या उपाययोजनांवर अवलंबून राहण्याऐवजी समुद्रात वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नियोजन करून कायमस्वरूपी जलसुरक्षा निर्माण करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव नगरसेवक तथा भाजप नेते ॲड. अंकित बंगेरा यांनी शासनाकडे मांडला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांनी खंडाळे-रुळे येथे धरण उभारण्याचा प्रस्ताव सादर करत, ‘टँकरमुक्त आणि जलसुरक्षित अलीबाग’ घडविण्यासाठी दीर्घकालीन नियोजनाची गरज अधोरेखित केली.
अलीबागच्या विकासासाठी सादर करण्यात आलेल्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये ॲड. बंगेरा यांनी जलसुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यांच्या मते, खंडाळे परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी धबधब्यांमधून थेट समुद्रात वाहून जाते. या नैसर्गिक जलसंपत्तीचे योग्य नियोजन करून ते साठवले, तर अलीबागचा भविष्यातील पाणीप्रश्न मोठ्या प्रमाणात कायमस्वरूपी मार्गी लागू शकतो.
यापूर्वी खंडाळे-रुळे धरणाचा प्रस्ताव शासनाच्या स्तरावर तयार झाला होता. मात्र विविध कारणांमुळे तो प्रत्यक्षात आला नाही. परिणामी दरवर्षी लाखो लिटर पावसाचे पाणी कोणताही उपयोग न होता समुद्रात मिसळत आहे. हा प्रस्ताव पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी जुन्या कागदपत्रांची छाननी करून तातडीने पुनर्विचार करण्यात यावा आणि धरण उभारणीची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी ॲड. बंगेरा यांनी केली.
प्रस्तावित धरणामुळे केवळ अलीबाग शहरालाच नव्हे, तर चेंढरे, कुरुळ आणि परिसरातील गावांनाही शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होऊ शकतो. उन्हाळ्यात निर्माण होणारे टँकरवरील अवलंबित्व कमी होईल, भूजल पातळीत वाढ होण्यास मदत मिळेल आणि वाढत्या लोकसंख्येसह पर्यटनाच्या गरजांसाठीही पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध राहील. त्यामुळे हा प्रस्ताव केवळ पाणीपुरवठ्याचा नसून अलीबागच्या भविष्यातील विकासाचा महत्त्वाचा पाया ठरू शकतो, असे त्यांनी नमूद केले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रस्तावाची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले. तसेच प्रस्तावावर सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाही करण्याबाबत अनुकूल शेरा नोंदविल्याची माहिती ॲड. बंगेरा यांनी दिली.
यावेळी ॲड. अंकित बंगेरा यांनी अलीबागच्या विकासासाठी अल्पकालीन उपायांपेक्षा दीर्घकालीन नियोजनाची आवश्यकता अधोरेखित केली. “समुद्रात वाहून जाणारा प्रत्येक पावसाचा थेंब हा अलीबागच्या भविष्यातील पाण्याचा साठा ठरला पाहिजे. आजची पाणीटंचाई दूर करण्याइतकेच पुढील अनेक दशकांच्या जलसुरक्षेची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
‘टँकरमुक्त अलीबाग’ ही केवळ घोषणा न राहता प्रत्यक्षात उतरावी आणि भावी पिढ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागू नये, यासाठी शासनाने खंडाळे-रुळे धरणाचा प्रस्ताव प्राधान्याने मार्गी लावावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.



