ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय
स्त्रीहट्ट, वारसाहट्ट आणि पालकमंत्री पदाची अट — भरत गोगावले स्वतःच्या स्वप्नांना तिलांजली देणार का?”

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
आविष्कार देसाई
अलिबाग |
रायगडमधील सत्तासमीकरणाचा प्रश्न आता मतांच्या आकड्यांवर उरलेला नाही. एका बाजूला आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांच्या अध्यक्षपदाचा आग्रह, तर दुसऱ्या बाजूला मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीची गणितं… आणि या दोन्हींच्या मध्ये खासदार सुनील तटकरे यांनी ठेवलेली पालकमंत्री पदाची अट. या सगळ्या घडामोडीकडे शांतपणे पाहत भाजप स्वतःसाठी सत्ता संरचना निश्चित करण्याच्या प्रयत्नात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रायगडमध्ये आता प्रश्न सत्ता कोणाची येणार याचा नसून निर्णय कोणासाठी घेतला जाणार याचा बनला आहे.
निवडणुकीचे आकडे पाहता चित्र सरळ दिसते.
राष्ट्रवादी काँग्रेस 16, भाजप 15 आणि बहुमताचा आकडा 31. म्हणजे सत्ता स्थापनेची किल्ली भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. मात्र अडथळा शिंदे गटाचा सहभाग आणि पदवाटपाचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद सत्तेत वाटा हवा असेल तर पालकमंत्री पद द्यावे अशी अट ठेवल्याची चर्चा आहे. म्हणजे खुर्ची शिंदे गटाकडे आणि नियंत्रण राष्ट्रवादीकडे, असे समीकरण उभे राहते.

जिल्हा परिषद अध्यक्षपद प्रतिष्ठेचे असले तरी प्रत्यक्षात जिल्ह्याचे प्रशासन चालवते ते पालकमंत्री पद. निधी वाटप, अधिकारी बदल्या आणि विकास कामांचे प्राधान्यक्रम या सर्वांवर पालकमंत्र्यांचा प्रभाव असतो. त्यामुळेच पालकमंत्री पदावर दावा करून राष्ट्रवादी काँग्रेसने थेट भरत गोगावले यांच्यावर दबाव निर्माण केल्याचे चित्र आहे. अध्यक्षपदापेक्षा जिल्ह्यावर नियंत्रण अधिक महत्त्वाचे मानून ही चाल खेळली गेल्याचे बोलले जाते.

दुसरीकडे महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी या अध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत. हा केवळ राजकीय दावा नसून स्थानिक पातळीवरील प्रतिष्ठेचा प्रश्न मानला जात आहे. त्यामुळे अध्यक्षपद मिळालेच पाहिजे अशी भूमिका घेतली जात असल्याने महायुतीतील शिंदे गटावर दबाव वाढत आहे.

याच वेळी भरत गोगावले यांच्यासमोर वेगळीच कोंडी उभी राहिली आहे. त्यांचे सुपुत्र विकास गोगावले देखील जिल्हा परिषदेत निवडून आले आहेत आणि भविष्यात अध्यक्षपदाची संधी निर्माण होऊ शकते. त्यामुळे त्यांच्या समोर दोन पर्याय उभे आहेत. पालकमंत्री पद टिकवून तात्काळ वर्चस्व राखणे किंवा पद सोडून भविष्यात मुलासाठी अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा करणे. त्यामुळे हा निर्णय राजकीय कमी आणि वारसासाठी केलेली राजकीय गुंतवणूक अधिक ठरतो.

राजकीय चर्चेनुसार समोर आलेला संभाव्य फॉर्म्युला असा की पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे, तर अध्यक्षपद भाजप आणि शिंदे गटात अडीच-अडीच वर्ष वाटून घ्यायचे. उपाध्यक्ष आणि सभापती पदांची विभागणी करायची. या फॉर्म्युल्याचा अर्थ स्पष्ट आहे. गोगावले यांनी पालकमंत्री पद सोडल्यास दळवी यांचे अध्यक्षपद, भविष्यात गोगावले यांच्या मुलाची संधी, राष्ट्रवादीचे प्रशासनावर नियंत्रण आणि भाजपची सत्ता टिकून राहणे हे सर्व साध्य होऊ शकते.
या सगळ्या संघर्षात भाजपची भूमिकाही वेगळीच दिसते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गट यांच्यातील वाद कितीही वाढला तरी अंतिम फायदा स्वतःकडे कसा खेचायचा याची रणनीती आखली जात असल्याचे बोलले जाते. अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद आपल्या वाट्याला आणायचे आणि महत्वाच्या विषय समित्यांची सभापती पदे ताब्यात ठेवायची म्हणजे प्रत्यक्ष कारभाराची किल्ली स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे चित्र आहे. इतर दोन पक्ष प्रतिष्ठा आणि पदांसाठी झगडत असताना नियंत्रणाची सूत्रे स्वतःकडे ठेवण्याची भूमिका असल्याने स्थानिक राजकारणात एक म्हण पुन्हा ऐकू येते. लग्न असो वा श्राद्ध, दक्षिणा मिळाली की झाले.
शेवटी रायगडमधील हा संघर्ष सत्तेचा नसून निर्णयामागच्या कारणाचा ठरणार आहे. एका बाजूला मानसी दळवी यांच्या अध्यक्षपदाच्या आग्रहातून प्रतिष्ठेचा प्रश्न उभा आहे, तर दुसऱ्या बाजूला विकास गोगावले यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीचा मार्ग मोकळा करण्याची गणितं आहेत. या दोन्ही भावनिक समीकरणांच्या मध्ये सुनील तटकरे यांची पालकमंत्री पदाची अट आणि भाजपची शांत रणनीती उभी आहे. त्यामुळे रायगडच्या सत्तानाट्याचा खरा प्रश्न आता इतकाच उरतो नेता काय ठरवतो यापेक्षा, तो कोणासाठी निर्णय घेणार.
……




