शाळेला सुट्टी म्हणजेच, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य; अतिवृष्टीच्या धोक्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
हवामान विभागाच्या गंभीर इशाऱ्यानंतर सात तालुक्यांतील शाळा-अंगणवाड्या २ जुलै रोजी बंद; शिक्षक-कर्मचाऱ्यांना मात्र उपस्थित राहण्याचे निर्देश

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
“सुटी” हा केवळ प्रशासकीय निर्णय नसून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणारे प्रतिबंधात्मक पाऊल आहे. भारतीय हवामान विभागाने रायगड जिल्ह्यात १ आणि २ जुलै रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार, तर काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी अलिबाग, पनवेल, उरण, श्रीवर्धन, म्हसळा, तळा आणि पोलादपूर तालुक्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २ जुलै रोजी सुटी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने खबरदारीचा मार्ग स्वीकारत हा निर्णय घेतला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, भारतीय हवामान विभागाच्या पूर्वसूचनेबरोबरच संबंधित तहसीलदारांनी स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन सादर केलेल्या अहवालांचाही विचार करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संततधार पाऊस, नद्या-नाल्यांच्या वाढलेल्या पाणीपातळ्या, सखल भागांतील पाणी साचण्याची शक्यता आणि विद्यार्थ्यांच्या प्रवासादरम्यान उद्भवू शकणारा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, हा निर्णय केवळ हवामानाचा अंदाज पाहून घेण्यात आलेला नसून स्थानिक प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या प्रत्यक्ष परिस्थितीच्या अहवालांवर आधारित आहे. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने आधीच खबरदारीची भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
मात्र, शाळांना सुटी जाहीर करण्यात आली असली तरी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कामकाजात सहकार्य करावे, असे स्पष्ट निर्देश आदेशात देण्यात आले आहेत.
रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदी, ओढे आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे तसेच प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.




