ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

“विश्वास, नियोजन आणि कामगिरीचा संगम; रायगड जिल्हा बँकेचा आर्थिक विक्रम; ४ वर्षांत ८५% वाढ, नफा ८७ कोटींवर”

व्यवसाय ७१०५ कोटींच्या पुढे; ठेवी ४०३७ कोटी, कर्जवाटपात ३०६८ कोटींची उत्तुंग भरारी 


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
अलिबाग  |
सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध कामगिरीच्या जोरावर रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०२५–२६ आर्थिक वर्षाअखेर विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. बँकेचा एकूण व्यवसाय तब्बल ७१०५.३३ कोटींवर पोहोचला असून ८७.१५ कोटींचा ढोबळ नफा मिळवत बँकेने गेल्या चार वर्षांत तब्बल ८५ टक्क्यांची लक्षणीय वाढ साध्य केली आहे.
बँकेच्या आकडेवारीनुसार, एकूण ठेवी ४०३७.१४ कोटींवर तर कर्जवाटप ३०६८.१९ कोटींवर पोहोचले आहे. तसेच बँकेचा स्वनिधी ७७७.१० कोटी इतका झाला असून आर्थिकदृष्ट्या बँकेचा पाया अधिक भक्कम झाल्याचे चित्र आहे. मागील आर्थिक वर्षातही बँकेने ८० कोटींपेक्षा अधिक नफा मिळवला होता, त्यामुळे यंदाची कामगिरी ही सातत्यपूर्ण प्रगतीचीच पुढची पायरी मानली जात आहे.
विशेष म्हणजे, बँकेने २०२५–२६ हे वर्ष ‘डिपॉझिट ग्रोथ वर्ष’ म्हणून घोषित केले होते. या उपक्रमाला शेतकरी, व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्य बचतदारांनी मोठा प्रतिसाद दिल्याने ठेवींमध्ये मोठी वाढ झाली. स्थानिक स्तरावर निर्माण झालेल्या या विश्वासामुळेच बँक आता राज्याच्या सीमा ओलांडत देशपातळीवरील अग्रगण्य सहकारी बँकांमध्ये गणली जाऊ लागली आहे.
रिझर्व्ह बँक आणि नाबार्डसारख्या प्रमुख वित्तीय संस्थांकडूनही बँकेच्या कार्यपद्धतीची दखल घेतली जात आहे. देशातील संगणकीकरण पूर्ण करणारी पहिली जिल्हा बँक म्हणूनही बँकेने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. याशिवाय बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांना राज्य शासनाचा ‘बेस्ट सीईओ’ पुरस्कार मिळाल्याने बँकेच्या यशात आणखी भर पडली आहे.
याबाबत बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, “ग्राहकांचा विश्वास, संचालक मंडळाची दूरदृष्टी आणि कर्मचाऱ्यांची निष्ठा यामुळे बँकेने ही ऐतिहासिक कामगिरी साध्य केली आहे. ‘डिपॉझिट ग्रोथ वर्ष’ या संकल्पनेला मिळालेला प्रतिसाद हा केवळ आर्थिक यश नसून बँक आणि ग्राहक यांच्यातील दृढ नात्याचे प्रतीक आहे.”
मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी सांगितले की, “तंत्रज्ञान, पारदर्शकता आणि वेगवान सेवा या त्रिसूत्रीवर आधारित कामकाजामुळे बँकेने सातत्याने प्रगती साधली आहे. डिजिटल बँकिंग, कृषी वित्त आणि एमएसएमई क्षेत्रावर लक्ष केंद्रित करत मार्च २०२८ पर्यंत बँकेचा व्यवसाय १०,००० कोटींवर नेण्याचा आमचा मानस आहे.”
आर्थिक कामगिरीसोबतच बँकेने सामाजिक बांधिलकीही जपली आहे. पगारदार खातेदारांसाठी ५० लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण, विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, तसेच ‘पीएम किसान’, ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती’ आणि ‘लाडकी बहीण’ योजनेतून लाभार्थ्यांना थेट मदत पोहोचवण्यात बँकेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
तसेच, नव्या नोकरभरतीमुळे शाखास्तरावरील सेवा अधिक गतिमान झाली असून डिजिटल माध्यमातून ग्राहकवृद्धीवरही भर देण्यात येत आहे. आगामी काळात ग्रामीण-शहरी आर्थिक समावेशन, उद्योग आणि शेती क्षेत्राला बळकटी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम राबवण्याचा बँकेचा मानस आहे.
……
जयंत पाटील (अध्यक्ष)
——
“ग्राहकांचा विश्वास, संचालक मंडळाची दूरदृष्टी आणि कर्मचाऱ्यांची निष्ठा यामुळे रायगड जिल्हा बँकेने ही ऐतिहासिक कामगिरी साध्य केली आहे. ‘डिपॉझिट ग्रोथ वर्ष’ या संकल्पनेला मिळालेला प्रतिसाद हा केवळ आर्थिक यश नसून बँक आणि ग्राहक यांच्यातील दृढ नात्याचे प्रतीक आहे. आगामी काळातही ग्राहककेंद्रित आणि विश्वासार्ह सेवा अधिक सक्षम करण्यावर आमचा भर राहील.”
……
मंदार वर्तक (मुख्य कार्यकारी अधिकारी)
——
“तंत्रज्ञान, पारदर्शकता आणि वेगवान सेवा या त्रिसूत्रीवर आधारित कामकाजामुळे बँकेने सातत्याने प्रगती साधली आहे. वाढत्या ठेवी व कर्जवाटपामुळे बँकेचा आर्थिक पाया अधिक भक्कम झाला आहे. डिजिटल बँकिंग, कृषी वित्त आणि एमएसएमई क्षेत्रावर लक्ष केंद्रित करत मार्च २०२८ पर्यंत बँकेचा व्यवसाय १०,००० कोटींवर नेण्याचा आमचा मानस आहे.”

Related Articles

Back to top button