ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड
रायगड पोलिसांचा अमली पदार्थ माफियांना मोठा दणका! ३२६.१० कोटींचा मुद्देमाल कायमचा नष्ट
१२ पोलीस ठाण्यांतील २७ गुन्ह्यांमधील तब्बल ३७९.६९१ किलो अमली पदार्थांचा नाश

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
रायगड जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध तस्करीविरोधात रायगड पोलिसांनी मोठी कारवाई करत एनडीपीएस कायद्यांतर्गत जप्त करण्यात आलेले तब्बल ३७९.६९१ किलो अमली पदार्थ नष्ट केले. या अमली पदार्थांची एकूण किंमत तब्बल ३२६ कोटी १० लाख ६ हजार ३२४ रुपये इतकी असून, जिल्ह्यातील १२ पोलीस ठाण्यांमध्ये दाखल २७ गुन्ह्यांमधील हा मुद्देमाल होता. अमली पदार्थांचा हा साठा नष्ट करून पोलिसांनी ड्रग्ज माफियांच्या आर्थिक कंबरड्यावर मोठा घाव घातला आहे.
रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी एनडीपीएस कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये गांजा, चरस, कोकेन आणि केटामाईन यांसारखे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या सर्व मुद्देमालाची मुंबई वेस्ट मॅनेजमेंट (Re-Sustainability Ltd.), तळोजा, नवी मुंबई येथे पर्यावरणपूरक आणि कायदेशीर पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.
ही संपूर्ण कारवाई रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, अति. कार्यभार पोलीस उपअधीक्षक (गुन्हे) निवृत्ती बोऱ्हाडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी या प्रक्रियेचे नियोजन व अंमलबजावणी केली.
अमली पदार्थ नाश प्रक्रियेदरम्यान जिल्हास्तरीय अमली पदार्थ नाश समिती, शासकीय पंच, न्यायवैद्यक प्रयोगशाळा, कलिना येथील तज्ज्ञ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तसेच वैधमापन शास्त्र विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सर्व कायदेशीर आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करून ही कारवाई करण्यात आली.
रायगड पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात सातत्याने कठोर भूमिका घेतली असून, केवळ तस्करांवर कारवाईच नव्हे तर जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ कायमस्वरूपी नष्ट करून ते पुन्हा बाजारात येणार नाहीत, याचीही दक्षता घेतली आहे. ३२६ कोटींपेक्षा अधिक किमतीचा अमली पदार्थांचा साठा नष्ट होणे ही रायगड पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी मोहिमेतील एक महत्त्वाची आणि प्रभावी कारवाई मानली जात आहे.




