ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसाहक्काने नियुक्तीचा मार्ग मोकळा


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

नवी मुंबई | ११ सप्टेंबर २०२५

महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संघर्ष समितीच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. नगर परिषद प्रशासन संचालनालयाने १० सप्टेंबर रोजी आदेश काढून राज्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसाहक्काने तात्काळ नियुक्ती देण्याचे निर्देश दिले आहेत. आदेशानुसार जर कोणत्याही नगरपालिकेने नियुक्ती न दिल्यास संबंधित मुख्याधिकाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई केली जाणार आहे.

९ सप्टेंबर रोजी नवी मुंबई येथे संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनी आयुक्त व संचालक अभिषेक कृष्णा यांच्यासोबत चर्चा केली होती. यावेळी अनेक नगरपालिकांनी अद्याप नियुक्ती प्रक्रिया न राबवल्याची बाब समोर आली. त्या पार्श्वभूमीवर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १० सप्टेंबरला तातडीने आदेश निर्गमित करण्यात आले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने २४ फेब्रुवारी २०२३ रोजी वारसा हक्काने नियुक्तीचा आदेश काढला होता. मात्र औरंगाबाद खंडपीठाने रिट याचिका दाखल झाल्यामुळे स्थगिती दिली होती. संघर्ष समितीच्या नेत्यांनी न्यायालयात सतत पाठपुरावा केला आणि ८ जानेवारी २०२५ रोजी स्थगिती उठवण्यात आली. त्यानंतर विभागाने २८ जानेवारी २०२५ रोजी नियुक्तीबाबत स्पष्ट आदेश काढले. तरीदेखील अनेक नगरपालिकांनी वरिष्ठ स्तरावर अभिप्राय मागवून नियुक्ती लांबवली होती.

या निर्णयामुळे राज्यातील हजारो सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना आता त्वरित नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संघर्ष समितीचे नेते डॉ. डी.एल. कराड, अॅड. सुरेश ठाकूर, संतोष पवार, अनिल जाधव, तसेच संघटनेतील इतर पदाधिकारी व कर्मचारी यांचे या लढ्यातील योगदान महत्वाचे ठरले.


Related Articles

Back to top button