ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय

मतपेटीतून उमटलेली ताकीद : शेकाप सावध होणार की बेफिकीर राहणार?

अलिबागमध्ये भाजपचा चंचू प्रवेश शेकापसाठी भविष्यातील धोक्याची घंटा


हा लेख काहींना अतिशयोक्तीपूर्ण वाटू शकतो, काहींची बौद्धिक आदळा आपट होऊ शकते, काहींना तो अस्वस्थ करणारा भासू शकतो. हा लेख वाचताना मनात रोष निर्माण होणंही स्वाभाविक आहे. मात्र चित्त आणि बुद्धी शांत ठेवून, पूर्वग्रह बाजूला सारून या लेखातील वस्तुस्थिती समजून घेतली, तर अलिबागच्या राजकीय भविष्याचा वेध घेणं नक्कीच सोपं होईल. हा लेख कुणाविरुद्ध नाही, तर जागं करण्याचा आणि सदैव जागं ठेवण्याचा एक प्रयत्न आहे. 

——————————————————

फडशा

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
आविष्कार देसाई 
रायगड : अलिबाग नगर परिषद निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष पुन्हा सत्तेत आला आहे, हे निर्विवाद सत्य आहे. 17 जागा, नगराध्यक्षपद आणि स्पष्ट बहुमत. आकड्यांच्या भाषेत हा विजय नक्कीच भक्कम दिसतो. मात्र या विजयाच्या झगमगाटामागे एक अस्वस्थ करणारी आणि सत्ताधारी शेकापसाठी धोक्याची घंटा ठरणारी वस्तुस्थिती दडलेली आहे. अवघ्या एका जागेवर अडकल्याचं चित्र दिसत असलं, तरी भारतीय जनता पक्षच्या 15 उमेदवारांना मिळून तब्बल 4 हजार 593 मते मिळाली आहेत. सुमारे 12 हजार मतदानाच्या पार्श्वभूमीवर हा आकडा किरकोळ नाही; तो शेकापच्या सत्तेला दिलेला थेट आणि स्पष्ट इशारा आहे. हे समजून घेणे गरजेचे आहे.
म्हणूनच अलिबागचा हा निकाल जल्लोष करण्याचा नसून, सत्ताधारी शेकापला जागं करणारा आहे. वरवरचा विजय आत्मसंतोष देऊ शकतो, पण मतपेटीतून उमटलेले संकेत दुर्लक्षित केले, तर उद्या हाच मतांचा प्रवाह सत्तेला थेट आव्हान देणारा ठरू शकतो. आज भाजप जागांच्या बाबतीत कमकुवत दिसतो, पण मतांच्या गणितात तो भविष्यातील प्रबळ विरोधक म्हणून उभा राहत असल्याचं चित्र धोकादायक आहे. राजकारणात आजची कमकुवत स्थिती उद्याची ताकद बनायला वेळ लागत नाही, हे  लक्षात घ्यायला हवं.
गेल्या पंचवीस–तीस वर्षांत अलिबाग नगर परिषदेत सत्ता उपभोगताना शेकापने शहराचा अपेक्षित सर्वांगीण विकास केला का, असा प्रश्न निवडणुकीच्या प्रचारात भाजपने उपस्थित केला होता.  दीर्घकाळ सत्ता हातात राहिली की निर्णयप्रक्रियेत सुस्ती येते, जबाबदारीची धार बोथट होते आणि त्यातूनच जनतेच्या मनात नाराजी साचू लागते. ही सामाजिक नाडी ओळखण्यात भाजप चूक करेल असं वाटत नाही. आज भाजपला मिळालेली मते ही नाराजीचीच नोंद आहे, हे वास्तव देखील नाकारून चालणार नाही.
अलिबाग शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजही जैसे थे आहे. लोकसंख्या वाढतेय, टोलेजंग इमारती उभ्या राहतायत, पण पाण्याच्या दीर्घकालीन नियोजनाचा ठोस आराखडा दिसत नाही. हा प्रश्न आज दुर्लक्षित केला, तर उद्या तो जनतेच्या संतापाचा उद्रेक बनेल. आणि विरोधक याचाच आयुध म्हणून वापर करण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
पाणीच नव्हे, तर रोजगार, आरोग्य सेवा, शिक्षण, महिला सुरक्षा, ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधा, मच्छरांचा वाढता प्रादुर्भाव, भुयारी गटार, सांडपाणी व्यवस्थापन आणि डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न हे सारे मुद्दे आजही रस्त्यावरच आहेत. कागदावरच्या योजनांचा सामान्य माणसाला उपयोग नसतो, त्याला प्रत्यक्ष बदल हवा असतो. तो बदल जर सत्ताधाऱ्यांना देता आला नाही, तर मतदार पर्याय शोधतो आणि तो पर्याय भाजपाच्या चंचू प्रवेशाने हळूहळू आकार घेत असल्याचे निकालावरून दिसून येते.
मतदार आज शांत आहे, पण तो अंध नाही. तो गप्प असतो, पण विसराळू नसतो. आज तो मतपेटीतून सूचक इशारा देतो आणि उद्या गरज पडली, तर सत्तेची उलथापालथही करतो. आज भाजपला मिळालेली मते ही केवळ आकडेवारी नाही, तर शेकापसाठी दिलेली गंभीर ताकीद आहे. हे सत्ताधाऱ्यांनी समजून घेणं आवश्यक आहे.
राजकारण हा आरसा असतो. तो खोटं दाखवत नाही, फक्त वास्तव स्पष्टपणे समोर ठेवतो. त्या आरशात दिसणारी वास्तववादी प्रतिमा स्वीकारून वेळीच सुधारणा करणं, यातच सत्ताधाऱ्यांचं खरं शहाणपण आहे. अन्यथा आजचा हा “भक्कम विजय” उद्या शेतकरी कामगार पक्षासाठीच धोक्याची सुरुवात ठरू शकतो.
……

Related Articles

Back to top button