ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड
महायुतीतील टीका-टोमण्यांवर तटकरेंचे मौन; मोजक्या शब्दांत बरेच काही बोलून गेले! रायगडच्या विकासकामांचा धडाका कायम

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
महायुतीतील घटक पक्षांकडून टीका-टोमणे होत असताना शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी अत्यंत संयमी शब्दांत प्रतिक्रिया दिली. ‘श्रीरंग बारणे हे माझे चांगले मित्र आहेत. आम्ही चांगल्या पद्धतीने काम करत आहोत,’ एवढेच ते म्हणाले. शब्द मोजके होते; मात्र, या मोजक्या शब्दांतून आणि त्यानंतर त्यांनी घेतलेल्या विकासकामांच्या आढाव्यातून तटकरे काहीच न बोलता बरेच काही बोलून गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनीही यापूर्वी तटकरेंवर विविध मुद्द्यांवरून टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर अलिबाग येथे विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत तटकरे यांनी सागरी महामार्ग, पूल, भूसंपादन, रेल्वे प्रकल्प, पूरग्रस्तांना मदत आणि विद्युत कामांचा आढावा घेतला.
सागरी महामार्गावरील विविध पुलांची कामे, भूसंपादन, मोबदला आणि प्रकल्पातील अडचणींचा आढावा घेण्यात आला. करंजा पुलासह अन्य पुलांची कामे प्रगतीपथावर असून, ती अधिक वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बाणकोट खाडीवरील पुलासाठी जमीन हस्तांतरणाचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याबद्दल तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या या प्रकल्पाला प्रशासनाने गती द्यावी, तसेच शासकीय आणि खासगी जमिनींच्या हस्तांतरणाची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
सागरी महामार्गाच्या अलायनमेंटवरही तटकरे यांनी प्रश्न उपस्थित केला. चार-पाच दशकांपूर्वीची आखणी आणि आजची बदललेली परिस्थिती याचा विचार करून मार्ग निश्चित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
यापूर्वी मोठ्या निधीतून डांबरीकरण झालेल्या रस्त्यावर पुन्हा खर्च करण्यापेक्षा भविष्यातील वाहतूक आणि वाढते नागरीकरण लक्षात घेऊन दीर्घकालीन नियोजन करावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
पेणच्या नव्या रेल्वे स्थानकाच्या कामालाही तटकरे यांनी गती देण्याचा निर्धार व्यक्त केला. भारत सरकारची मान्यता मिळाल्यानंतर स्थानकाचा आराखडा तयार करण्यात आला असून, तो विमानतळाच्या धर्तीवर तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पेणच्या नागरिकांसमोर आराखडा मांडून सूचना घेण्यात येणार असून, त्यानंतर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून अंतिम स्वरूप दिले जाईल. रोहा स्थानकाची निविदा प्रक्रिया झाल्यानंतर पहिल्या दोन महिन्यांत पेण स्थानकाचीही निविदा काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.
कोकण रेल्वेच्या अखत्यारीतील कमी उंचीच्या प्लॅटफॉर्मचा प्रश्न, नागोठणे आणि अन्य स्थानकांवरील सुविधांबाबतही मध्य रेल्वे व कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अलीकडील पुरामुळे बाधित दुकानदारांना मदत देण्याच्या प्रक्रियेचाही आढावा घेण्यात आला. पात्र लाभार्थ्यांना मदत मिळावी, यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या. निसर्ग चक्रीवादळानंतर सुरू असलेल्या भूमिगत विद्युत वाहिन्यांच्या कामांचीही माहिती घेण्यात आली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ११ सप्टेंबरपासून कोकणात मोठ्या प्रमाणावर नागरिक येण्याची शक्यता असल्याने वाहतूक आणि प्रशासकीय व्यवस्थेबाबतही अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
महायुतीतील घटक पक्षांच्या टीका-टोमण्यांवर तटकरेंनी संयमाची भूमिका घेतली असली, तरी रायगडातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेत त्यांनी आपला विकासाचा अजेंडा स्पष्टपणे पुढे ठेवला. त्यामुळे ‘टीकेला प्रतिटोला न देता कामातूनच राजकीय संदेश’ देण्याचा तटकरेंचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
……




