ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

जनसुरक्षा नाही, जनतेच्या गळचेपीचा कायदा! १० सप्टेंबरला महाराष्ट्र आंदोलनासाठी पेटून उठणार 


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : लोकशाही गळचेपीच्या विरोधात महाराष्ट्र पेटणार! जनतेच्या हक्कांवर घाला घालणाऱ्या ‘जनसुरक्षा विधेयका’ला आव्हान देण्यासाठी राज्यभर ‘निर्धार आंदोलनाची’ ठिणगी पेटली आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह विविध डाव्या, समाजवादी आणि आंबेडकरवादी पक्ष- संघटनांच्या नेतृत्वाखाली १० सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक शहरात ‘जुलमी कायद्याचा’ जाहीर निषेध होणार आहे.
पाशवी बहुमताचा गैरवापर
या विधेयकाला राज्यभरातून तब्बल १३ हजार हरकती दाखल झाल्या. त्यापैकी ९,५०० हरकतींमध्ये हा कायदा रद्द करावा अशी स्पष्ट मागणी करण्यात आली होती. हे महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच झालेले उदाहरण आहे. एवढा लोकविरोध असूनही या हरकतींची दखल न घेता, लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष म्हणणे मांडण्याची संधी न देता, सत्ताधाऱ्यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात बहुमताचा बळ वापरून हा कायदा मंजूर करून घेतला.
लोकशाहीवर गदा
हा कायदा म्हणजे लोकशाही तत्त्वांना पायाखाली तुडवणारा आहे. नागरिकांच्या हक्कांना गळफास घालणारा, प्रशासनाला अमर्याद अधिकार देणारा, आणि सरकारवर टीका करणाऱ्यांना दाबून टाकणारा असा हा कायदा आहे. विरोध करणाऱ्यांचा आवाज गप्प करण्यासाठी हा ‘जनसुरक्षा’ नावाचा जनतेच्या गळचेपीचा कायदा आणला गेला असल्याची टीका होत आहे.
विरोधाचा ज्वालामुखी
याआधी २२ एप्रिल रोजी राज्यातील ७८ ठिकाणी तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने झाली होती. ३० जून रोजी मुंबईत विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विराट मोर्चा काढण्यात आला होता. तसेच स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या परिषदेने राज्यभर सातत्याने आंदोलन उभारण्याचा निर्धार केला होता.
या परिषदेतील शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत ठरलेला निर्धार आता प्रत्यक्षात येणार आहे.
आंदोलनाचे रणशिंग फुंकले
१० सप्टेंबर रोजी तालुका, जिल्हा, शहर पातळीवर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापाशी एकत्र जमून आंदोलन केले जाणार आहे. सरकारविरोधात असहकाराचा इशारा देत, या जुलमी कायद्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
सहभागी पक्ष व संघटना
या लढ्यात भाकप, माकप, शेकाप, भाकप माले, समाजवादी पक्ष, सकप, भारिप (से), भारत जोडो अभियान, श्रमिक मुक्ती दल आणि जनआंदोलनाची संघर्ष समिती यांनी खांद्याला खांदा लावला आहे.

Related Articles

Back to top button