ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
सहयोग संस्थेचे गतीमान कामकाज : सहकारातून उभी राहिली विश्वासाची भक्कम भिंत – जयंत पाटील
रौप्य महोत्सवी टप्प्यावर २५ टक्के लाभांश जाहीर; सहकार क्षेत्रात सहयोग पतसंस्थेची विश्वासहार्य वाटचाल

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : “सहकार हीच खरी ताकद असून सहयोग संस्थेचे कामकाज गतीमान व अनुकरणीय आहे,” असे गौरवोद्गार रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन जयंत पाटील यांनी काढले. अलिबाग येथे आयोजित सहयोग व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या 25 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
रायगड जिल्ह्यात सहकार मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. गोरगरीबांसाठी पतसंस्था व पतपेढ्या हे मोठे बळ ठरत असून सहयोग संस्थेचे काम उत्तम असल्याचे पाटील यांनी नमूद केले. “पुढील काळात अर्थकारण बदलणार आहे. त्याचा अभ्यास करून सहयोग संस्था आणखी उंची गाठेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चेंढरे येथील चिंतामणराव केळकर विद्यालयाच्या सभागृहात रविवारी (दि. 14) ही सभा पार पडली. यावेळी संस्थेचे चेअरमन योगेश मगर, उपाध्यक्ष संजय पाटील, संचालक, सभासद, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“गेल्या 35 वर्षांच्या सहकार क्षेत्रातील कामकाजात कधीही राजकारण केले नाही. जिल्हा बँकेच्या माध्यमातून राज्यात सहकाराला नवे बळ दिले. पतपेढी चालविणे सोपे नाही, मात्र सहयोग संस्थेची वाटचाल शून्यातून सुरु होऊन आज शंभर कोटींच्या उंबरठ्यावर पोहचत आहे, ही अभिमानास्पद बाब आहे,” असेही जयंत पाटील म्हणाले.
रौप्य महोत्सवी टप्पा
सहयोग व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था 2000 मध्ये सुरु झाली. गोरगरीबांसह लघुउद्योजकांना आर्थिक आधार देत 25 वर्षांत संस्थेने भक्कम स्थान निर्माण केले आहे. सध्या संस्थेकडे तब्बल 50 कोटी ठेवी असून यावर्षी 25 टक्के लाभांश जाहीर करून महाराष्ट्रातील पहिली पतसंस्था ठरल्याचा अभिमान व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, रौप्य महोत्सवी वर्षात संस्थेची कामगिरी उत्साहात साजरी झाली. प्रसंगी मोठ्या संख्येने सभासद ठेवीदार हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




