क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

२० धावांची आघाडी निरर्थक ठरली… अखेरच्या सत्रात साताऱ्याची आग ओकणारी गोलंदाजी, बीडचा पराभव


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
रायगड : जिल्ह्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आयोजित १९ वर्षांखालील मुलांच्या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत खऱ्या अर्थाने कसोटी क्रिकेटचा थरार पाहायला मिळाला. गव्हाण येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर मैदानावर रंगलेल्या बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशन विरुद्ध सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशन या सामन्यात जिंकलेला सामना हातातून निसटण्याचा धक्कादायक अनुभव बीडला, तर हरलेला सामना जिद्दीने खेचून आणण्याची किमया साताऱ्याने साधली.
पहिल्या डावात सातारा संघ २०१ धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर बीडने २२१ धावा करत २० धावांची आघाडी घेतली आणि सामन्यावर पकड मिळवल्याचे चित्र होते. मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, हे साताऱ्याने दुसऱ्या डावात ठामपणे सिद्ध केले.
दुसऱ्या डावात सातारा अवघ्या १०६ धावांवर आटोपला. बीडसमोर सामना जिंकण्यासाठी केवळ ८७ धावांचे माफक लक्ष्य होते आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ संपायला ४१ षटके शिल्लक होती. सामना बीडच्या बाजूने झुकलेला असतानाच, साताऱ्याच्या गोलंदाजांनी मैदानावर अक्षरशः वादळ घातले.
ईशान जोशी (४ बळी) आणि श्रावण खाडे (५ बळी) यांनी अचूक मारा करत बीडच्या फलंदाजांची एकामागोमाग एक शिकार केली. पाहता पाहता बीडचा दुसरा डाव अवघ्या ६२ धावांत कोसळला आणि साताऱ्याने २४ धावांनी थरारक आऊटराईट विजय साकारला.
पहिल्या डावात आघाडी असूनही सामना गमावण्याची नामुष्की बीडच्या वाट्याला आली, तर साताऱ्यासाठी हा विजय संघभावना, संयम आणि कसोटी मानसिकतेचे सर्वोत्तम उदाहरण ठरला.
सामन्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट अकॅडमीचे अध्यक्ष अमित कडू, सुजित ठाकूर, सुदेश ठाकूर, रोशन ठाकूर आणि आरडीसीए उपाध्यक्ष राजेश पाटील उपस्थित होते. सामनाधिकारी म्हणून चंद्रकांत म्हात्रे, ॲड. पंकज पंडित आणि सनी म्हात्रे यांनी काम पाहिले.
विजयानंतर सातारा संघाचे प्रशिक्षक हेमंत गुजर यांनी सांगितले,
“खेळाडूंनी मैदानावर घेतलेल्या मेहनतीचेच हे फळ आहे. सर्व गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत हरलेला सामना जिंकून दाखवला. संपूर्ण संघाचे मनापासून अभिनंदन.”
……

Related Articles

Back to top button