ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
पाणी द्या, नाहीतर अधिकाऱ्यांच्या खुर्च्याच ताब्यात घेऊ!; “ढवळे ब्रदर्स”चा चेंढरे ग्रामपंचायत प्रशासनावर हल्लाबोल
हंडे घेऊन महिलांचा ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा; ‘निवेदन कोणाला द्यायचे?’ म्हणत दत्ता ढवळेंचा सवाल, संदीप ढवळेंचाही संतप्त इशारा

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
नागरिक पाण्याच्या थेंबासाठी हंडे घेऊन ग्रामपंचायतीच्या दारात उभे आणि ज्या खुर्च्यांवर बसून नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे देण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे, त्याच अधिकाऱ्यांच्या खुर्च्याच ताब्यात घेण्याचा इशारा ग्रामस्थांच्या आंदोलनातून देण्यात आला. दीड-दोन वर्षांपासून चेंढरे ग्रामपंचायत हद्दीत पाण्याचा प्रश्न धगधगत असतानाही पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी अखेर ग्रामपंचायतीवर धडक दिली. शेकापचे नेते दत्ता ढवळे आणि संदीप ढवळे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात महिलांनी हंडे घेऊन सहभाग घेतला. त्यामुळे चेंढरे ग्रामपंचायत परिसरात प्रशासनाच्या कारभाराविरोधात संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला.

पाण्यासाठी ग्रामस्थांना रस्त्यावर उतरावे लागणे आणि अखेर अधिकाऱ्यांच्या खुर्च्या ताब्यात घेण्याचा इशारा देण्याची वेळ येणे, ही प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब असल्याची भावना आंदोलनातून व्यक्त झाली.
मोर्चा ग्रामपंचायतीवर धडकताच दत्ता ढवळे यांनी थेट आक्रमक पवित्रा घेतला. मोर्चा येणार असल्याची पूर्वकल्पना असतानाही ग्रामसेवक निलेश गावंड आणि प्रशासक ज्ञानेश्वर साळावकर उपस्थित नसल्याचा आरोप त्यांनी केला. ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी निवेदन स्वीकारण्यासाठी खाली आले असता ढवळे यांनी प्रशासनाला थेट सवाल केला.

“आम्ही येणार आहोत हे माहिती असतानाही ग्रामसेवक निलेश गावंड आणि प्रशासक ज्ञानेश्वर साळावकर येथे का नाहीत? आम्ही निवेदन कोणाला द्यायचे?” असा सवाल दत्ता ढवळे यांनी केला.
नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी जबाबदार अधिकारीच उपस्थित नसतील, तर ग्रामस्थांनी दाद कोणाकडे मागायची, असा सवाल करत ग्रामसेवक निलेश गावंड किंवा प्रशासक ज्ञानेश्वर साळावकर प्रत्यक्ष चर्चेसाठी येईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे दत्ता ढवळे यांनी ठणकावले.
त्याहून पुढे जात त्यांनी, “जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही. गरज पडली तर अधिकाऱ्यांच्या खुर्च्या आमच्या ताब्यात घेऊ आणि पाण्याचा प्रश्न सुटल्यानंतर त्या परत करू,” असा थेट इशारा दिला. या भूमिकेमुळे ग्रामपंचायत परिसरातील वातावरण चांगलेच तापले.
यानंतर संदीप ढवळे यांनीही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. “पाण्याचा एवढा गंभीर प्रश्न असताना तुमचे अधिकारी येथे थांबणे गरजेचे आहे. हे सर्व ग्रामस्थ मूर्ख म्हणून येथे आले आहेत का?” असा संतप्त सवाल त्यांनी केला.
आंदोलनकर्त्यांनी त्यानंतर प्रशासक ज्ञानेश्वर साळावकर यांच्याशी तातडीने फोनवर संपर्क साधण्याची मागणी केली. संबंधित कर्मचाऱ्यांनी प्रशासक ज्ञानेश्वर साळावकर यांच्याशी संपर्क साधला. मात्र, प्रत्यक्ष भेट होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका संदीप ढवळे यांनी घेतली. “तुम्ही स्वतः येथे येत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी प्रशासक ज्ञानेश्वर साळावकर यांना दिला.

दरम्यान, फोनवरील चर्चेत प्रशासक ज्ञानेश्वर साळावकर यांनी संबंधित कंपनीने पाण्याचा स्रोत बंद केल्यामुळे पाण्याची समस्या निर्माण झाल्याचे सांगितले. मात्र, हे कारण दत्ता ढवळे यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले.
“कोणत्या कंपनीने पाण्याचा स्रोत बंद केला, हा आमचा प्रश्न नाही. ग्रामपंचायत म्हणून नागरिकांना पाणीपुरवठा करणे ही तुमची जबाबदारी आहे. पाणी कुठून आणायचे, कसे उपलब्ध करून द्यायचे, हे तुमचे काम आहे. आमच्याकडून पाणीपट्टी वसूल करताना मग तुम्ही तुमची जबाबदारी विसरू शकत नाही,” असा घणाघात दत्ता ढवळे यांनी केला. कारणे सांगण्यापेक्षा नागरिकांना पाणी उपलब्ध करून द्या, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली.
प्रशासकीय कालावधीत रस्ते, गटारे यांसारख्या मूलभूत सुविधांवर काम होत नसल्याचे सांगत निदान नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तरी निधी खर्च करा, अशी मागणी दत्ता ढवळे यांनी केली.
संबंधित सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी कंपनीशी चर्चा करून पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवण्याची सूचनाही त्यांनी प्रशासक ज्ञानेश्वर साळावकर यांना केली. ग्रामपंचायतीला जबाबदारी झटकून चालणार नाही, नागरिकांकडून पाणीपट्टी घेतली जात असेल तर त्यांना पाणी देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे, अशी ठाम भूमिका ढवळे यांनी मांडली.
अखेर ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा आणि महिलांनी हंडे घेऊन केलेल्या आंदोलनाची तीव्रता पाहता प्रशासक ज्ञानेश्वर साळावकर यांनी दोन दिवसांत पाण्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दत्ता ढवळे आणि संदीप ढवळे यांनी उपस्थित ग्रामस्थांशी चर्चा केली. प्रशासक ज्ञानेश्वर साळावकर यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
मात्र, दोन दिवसांत पाण्याचा प्रश्न सुटला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा या आंदोलनातून देण्यात आला आहे. पाण्यासाठी हंडे घेऊन ग्रामपंचायतीच्या दारात उतरलेल्या महिलांपासून ते अधिकाऱ्यांच्या खुर्च्याच ताब्यात घेण्याच्या थेट इशाऱ्यापर्यंत पोहोचलेले हे आंदोलन चेंढरे ग्रामपंचायतीच्या कारभारासाठी मोठा इशारा ठरले आहे.
याप्रसंगी एडवोकेट परेश देशमुख, अविनाश राणे, दिलीप कदम, बी एस पाटील, तानाजी कदम, अतुल जाधव, प्रिया ढवळे, नागेश्वरी हेमाडे, सायली ढवळे, अंकिता घरत, आरती तांबे यासह अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
……




