ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

मोंथा चक्रीवादळ महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर, पण रायगडात आधीच घोंगावले शेकापचे ‘लाल वादळ’!


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
रायगड : मोंथा चक्रीवादळ आंध्र प्रदेशातील काकीनाडाजवळ किनारपट्टीवरून वायव्य दिशेने सरकत असताना,  महाराष्ट्रात ते धडकण्याआधीच शेतकरी कामगार पक्षाचे लाल वादळ बुधवारी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले!
अलिबाग तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने भात, भाज्या आणि सुपारी बागायतींचे प्रचंड नुकसान केले आहे. अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान इतके मोठे आहे की त्यांचे जगणेच संकटात आले आहे. मात्र प्रशासन मात्र नेहमीप्रमाणे डोळ्यावर कातडी ओढून मौनव्रत धारण केल्यासारखे शांत आहे.
या निष्क्रिय प्रशासनाविरोधात शेतकरी कामगार पक्षाने बुधवारी आक्रमक पवित्रा घेतला. पक्षाच्या बॅनरखाली संतप्त शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकारी किशन जावळे यांना निवेदन सादर केले. त्यांनी तातडीने सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी करत, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
 “शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे, पण अधिकारी अजून पाहणीच करत आहेत. आम्हाला आश्वासन नको, निर्णय हवा! अन्यथा पुढचं आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यांवरच होईल,” – शेतकरी कामगार पक्षाचा इशारा.
आंदोलनादरम्यान परिसर घोषणाबाजीने दणाणून गेला. लालबावटा हातात घेऊन कार्यकर्ते आक्रमक पवित्र्यात प्रशासनाचा निषेध करत होते. अलिबागच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खरंच “लाल वादळ घोंगावले” असंच दृश्य पाहायला मिळालं.
शेतकऱ्यांची मागणी स्पष्ट “सरसकट पंचनामे करा, तात्काळ मदत द्या; नाहीतर लाल वादळ पुन्हा येईल!”
याप्रसंगी शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य महिला आघाडी प्रमुख एडवोकेट मानसी म्हात्रे, शेतकरी कामगार पक्षाच्या राज्यप्रवक्त्या चित्रलेखा पाटील, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी नगरसेवक प्रदीप नाईक, अलिबाग तालुका शेतकरी सभा अध्यक्ष अनिल गोमा पाटील, एडवोकेट गौतम पाटील, सुरेश घरत यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button