ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय

खुर्चीची ताकद मोठी, वर्तन छोटं ! रायगड जि.प. सभेत अहंकार, अज्ञान आणि बेशिस्तीचा कळस; प्रशासनाने एका बैठकीत ओळखली प्रत्येकाची ‘बालिश कुवत’?


फडशा 
अलिबाग   |
आविष्कार देसाई 
रायगड जिल्हा परिषदेची मंगळवारी (ता.७) झालेली सर्वसाधारण सभा ही लोकशाहीची बैठक नसून उघडपणे उधळलेला गोंधळ, अहंकार आणि अज्ञानाचा बाजार असल्याचे चित्र समोर आले. “मोठेपणाचा केला गजर, अंतरी राहिला बालस्वभाव” हा संत तुकारामांचा अभंग जणू या सभागृहासाठीच लिहिला होता, असे म्हणावे लागेल. सत्तांतरानंतर मोठ्या खुर्च्या मिळाल्या, पण त्या खुर्च्यांचा भार पेलण्याइतकी समज किंवा शिस्त अनेक सदस्यांकडे नाही, हे पहिल्याच सभेत ठळकपणे उघडे पडले.
या साऱ्या गोंधळातून एक गोष्ट मात्र निर्विवादपणे स्पष्ट झाली प्रशासनाने प्रत्येक सदस्याची खरी “कुवत” ओळखून घेतली आहे! सभागृहात झालेल्या बेशिस्त वर्तनातून कोण किती सक्षम, कोण किती उथळ आणि पुढे कोण कसा कारभार करणार याची स्पष्ट प्रचिती अधिकाऱ्यांना आली आहे. म्हणजेच, ही सभा केवळ चर्चा नव्हती, तर प्रशासनासाठी सदस्यांना तराजूत तोलून पाहण्याचीच संधी ठरली. आता पुढे प्रशासन कोणाला किती गांभीर्याने घेणार, हेही या “पहिल्या छापे”वर ठरणार, हे नक्की!
सभागृहाचे नियम, बोलण्याची पद्धत, विषय मांडण्याचे भान सगळंच उघडपणे तुडवलं जात होतं. उभं राहून बोलण्याची साधी तसदी न घेता काही सदस्य बसल्या जागेवरून माइकवर आरडाओरडा करत होते, आणि त्यामुळे ही बैठक नसून आरडाओरडाचा बाजार भरल्याचा भास निर्माण झाला.
सभागृहात चर्चा नव्हतीच फक्त अहंकाराचा उन्माद होता. प्रत्येकाला बोलायचं होतं, पण कुणालाच ऐकायचं नव्हतं. माइकवर ताबा मिळवण्यासाठी सुरू असलेली झुंबड ही लोकशाहीच्या प्रक्रियेची थेट चेष्टा होती. अध्यक्ष मंगेश वाकडीकर सदस्यांना आवरण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांची अवस्था अक्षरशः असहाय्य प्रमुखासारखी झाली होती. उपाध्यक्ष मधुकर पाटील यांनी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, पण “समजुतीचा झाला अभाव” इतका टोकाला गेला होता की, सभागृहात शिस्त हा शब्दच अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले. एकीकडे सदस्यांचा बालिशपणा कळसाला पोहोचला होता, तर दुसरीकडे अधिकारी निवांत गप्पांमध्ये रमलेले होते. काहींनी चेहऱ्यावर बनावटी गंभीरपणाचा मुखवटा लावला होता, पण प्रत्यक्षात जनतेच्या प्रश्नांविषयीची त्यांची बेफिकिरी ठळकपणे दिसून येत होती.
पाणी, आरोग्य आणि शिक्षणासारखे जिव्हाळ्याचे प्रश्न पुन्हा पुन्हा मांडले गेले, पण त्यावर सुरुवातीला कोणतीही ठोस दिशा दिसली नाही. जलजीवन मिशनसारख्या महत्त्वाच्या विषयावर निर्णय जाहीर झाल्यानंतरही त्याच मुद्द्यांची निर्थक पुनरावृत्ती सुरूच राहिली, ज्यामुळे ही सभा चालू आहे की दिशाहीन बडबड सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित झाला. त्यातच सभागृहात सदस्यांपेक्षा त्यांच्या नातेवाईकांची आणि मित्रमंडळींची गर्दी अधिक दिसत होती; इस्त्रीचे कडक कपडे घालून आलेल्या या लोकांमुळे संपूर्ण वातावरण हे अधिकच दिखाऊ आणि हास्यास्पद झाले. जनतेच्या पैशावर चालणाऱ्या या सभेचे रूपांतर उघडपणे “शो-ऑफ”मध्ये झाल्याचे चित्र लपवता येत नव्हते.
एकंदरीत, पद मिळालं, वय वाढलं, खुर्च्या मिळाल्या  पण बुद्धी, शिस्त आणि जबाबदारी मात्र शून्यच राहिली. “राग-लोभाचा खेळ मांडला, समजुतीचा झाला अभाव” हे केवळ अभंगातील शब्द राहिले नाहीत, तर या सभागृहातील प्रत्येक क्षणाचं जिवंत वास्तव बनले आणि शेवटी संत तुकारामांच्याच शब्दांत सांगायचं झालं तर “वय वाढले देहामाजी, बुद्धी राहिली लहानचि… मोठेपण हे खोटेचि”  यापेक्षा या संपूर्ण प्रकाराचं अचूक वर्णन दुसरं असूच शकत नाही.
………
एकदाच खाते वाटप पार पडल !
__________

सभेच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची प्रशासकीय बाब म्हणजे विविध सभापतींना खातेवाटप करण्यात आले. अध्यक्ष मंगेश वाकडीकर हे स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती राहणार असल्याचे निश्चित करण्यात आले, तर उपाध्यक्ष मधुकर पाटील यांच्याकडे बांधकाम व आरोग्य विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली. चंद्रकांत कळंबे यांना अर्थ, शिक्षण व क्रीडा विभाग देण्यात आले, तर वैकुंठ पाटील यांच्याकडे कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापतीपद देण्यात आले. 

……

Related Articles

Back to top button