“समृद्ध ग्रामविकासासाठी रायगड सज्ज – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची जिल्ह्यात धडाक्यात अंमलबजावणी”

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग : गावांचा शाश्वत व सर्वांगीण विकास साधण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जाहीर केले असून, ते १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान राबविण्यात येणार आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी रायगड जिल्हा परिषद प्रशासनाने सज्जता दर्शवली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना राज्य शासनाकडून मोठ्या रकमेचे पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
ग्रामविकासाच्या योजना वेगाने आणि प्रभावीपणे अंमलात आणून त्यांचा थेट लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे, लोकसहभाग वाढवणे, आरोग्य-शिक्षण-उपजीविका-सामाजिक न्याय या क्षेत्रांत ग्रामपंचायतींचा सहभाग वाढवणे, तसेच पंचायत राज संस्था गतिमान करणे हा या अभियानामागचा मुख्य उद्देश आहे.
अभियानासाठी प्रत्येक तालुक्यात २० ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. त्यांच्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले जाणार असून, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय आणि ग्रामपंचायत स्तरावर नोडल अधिकारी व पालक अधिकारी नेमण्यात आले आहेत.
याच अनुषंगाने सर्व सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकार्यांची जिल्हास्तरीय कार्यशाळा ८ सप्टेंबर रोजी कुरुळ (आरसीएफ सभागृहात) आयोजित करण्यात आली आहे.
अभियानाचे प्रमुख सात घटक :
लोकाभिमुख सक्षम पंचायत प्रशासन
आर्थिक सक्षम पंचायत (स्वनिधी, विकासनिधी व लोकवर्गणी)
जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव
मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण
गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण
उपजीविका विकास व सामाजिक न्याय
लोकसहभाग व श्रमदानातून जनचळवळ
….



