ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
“पोलिस कोठडीत भूषण पतंगेचा मृत्यू! रायगड पोलिसांवर संशयाचे सावट — ‘जाब द्या नाहीतर चौकशीला सामोरे जा!’ वंदना मोरे यांचा थेट इशारा”
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेऊन सखोल चौकशीची मागणी करणार

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : बनावट नोटा प्रकरणातील आरोपी भूषण पतंगेच्या पोलिस कोठडीत झालेल्या मृत्यूने रायगड पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
“आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू होतो आणि पोलिस ‘फिट्स आले’ एवढं सांगून जबाबदारी टाळतात. हे संशयास्पद नाही का?” असा थेट सवाल ताराराणी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा वंदना मोरे यांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी त्या लवकरच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
मोरे यांनी अलिबाग येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, “भूषण पतंगे याच्या कृत्याचे आम्ही समर्थन करत नाही. पण चौकशीच्या फेऱ्यात असताना आरोपीचा अचानक मृत्यू होतो. ही बाब अत्यंत गंभीर आहे. पोलिसांना त्याची मेडिकल हिस्ट्री माहिती होती, मग त्यांनी मेडिकल कस्टडी न घेता पोलिस कोठडीची मागणी का केली?” असा सवाल उपस्थित केला आहे.
३ ऑक्टोबर २०२५ रोजी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार अलिबाग येथील भूषण पतंगेच्या घरावर छापा टाकण्यात आला.
त्या ठिकाणी बनावट नोटा तयार करण्याचा कारखाना सापडला आणि पोलिसांनी लाखो रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.
४ ऑक्टोबरला गुन्हा दाखल करून भूषण पतंगे याला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक मोरे हे करत होते. न्यायालयाने भूषण पतंगे याला पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली होती.
मात्र, चौकशीदरम्यान भूषण पतंगेची तब्येत अचानक बिघडली. त्याला अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तेथील डॉक्टरांनी स्थिती गंभीर असल्याने मुंबईच्या जेजे रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. मुंबईत उपचारादरम्यान, दोन दिवसांची कोठडी बाकी असतानाच भूषण पतंगेचा मृत्यू झाला.
मोरे यांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र प्रश्न उपस्थित केले. “जर त्याला फिट्सचा आजार होता, तर पोलिसांनी डॉक्टरांच्या देखरेखीखाली चौकशी का केली नाही? दोन दिवस कोठडी शिल्लक असताना पोलिसांनी वैद्यकीय कारणास्तव न्यायालयीन कोठडीची मागणी का केली? पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी मृत पावतो आणि कोणीच जबाबदार नाही.हे नेमकं काय चाललं आहे रायगड पोलिसांमध्ये?”
त्या पुढे म्हणाल्या, “मी भूषण पतंगेच्या कुटुंबीयांना भेटले. त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचं सावट आहे. ते न्याय मागत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. आम्ही हे प्रकरण इथे थांबू देणार नाही.”
या सर्व घडामोडींमुळे रायगड पोलिसांवर संशयाचे गडद सावट पसरले आहे.
ताराराणी ब्रिगेडने या प्रकरणात स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली असून,
“या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी मी लवकरच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेणार आहे,” असे वंदना मोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान, पोलीस अधीक्षक आंचाल दलाल यांच्याशी संपर्क साधला असता पोलीस त्यांच्या पद्धतीने काम करत असल्याचे अगदी एका ओळीचे स्टेटमेंट त्यांनी सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉमशी बोलताना दिले.




