क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
अलिबागच्या रस्त्यांवर १४ ऑगस्टला तिरंगा; बाइक रॅलीतून शहराच्या इतिहासाला मिळणार देशभक्तीची सलामी
धर्म, इतिहास, व्यापार आणि समुद्राला जोडणाऱ्या मार्गावरून तिरंगा देशभक्ती रुजवणार, अलिबाग नगर परिषदेचा उपक्रम

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
एकीकडे अलिबागचा इतिहास, दुसरीकडे धार्मिक-सामाजिक सलोखा, मध्ये शहराची गजबजलेली बाजारपेठ आणि शेवटी अथांग समुद्रकिनारा… या सगळ्यांना जोडत १४ ऑगस्टला अलिबागच्या रस्त्यांवर तिरंगा दौडणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत अलिबाग नगरपरिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आलेली तिरंगा बाइक रॅली केवळ दुचाकींची रॅली न राहता शहराच्या विविध ओळखीला एका तिरंग्याखाली आणणारा देशभक्तीचा प्रवास ठरणार आहे.
केंद्र शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान आणि देशभक्तीची भावना जागविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर अलिबाग नगरपरिषदेने १४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता तिरंगा बाइक रॅलीचे आयोजन केले आहे.
या रॅलीचे वैशिष्ट्य तिच्या मार्गात दडले आहे.
अलिबाग नगरपरिषद कार्यालयापासून सुरू होणारी रॅली थेट शहराच्या इतिहास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनाच्या विविध पदरांना स्पर्श करत अलिबाग समुद्रकिनारी पोहोचणार आहे.
नगरपरिषद कार्यालयातून रॅलीला सुरुवात झाल्यानंतर बस स्थानक, महावीर चौक, ब्राह्मणआळी श्रीराम मंदिर, श्री. नेने यांचे घर, युनियन बँक ऑफ इंडिया, जुने नगरपरिषद कार्यालय, बालाजी नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुने मार्केट, जामा मशीद, मारुती नाका असा प्रवास करत रॅलीचा समारोप अलिबाग समुद्रकिनारी होणार आहे.
या मार्गातील प्रत्येक ठिकाण अलिबागच्या वेगळ्या ओळखीची साक्ष देणारे आहे. धार्मिक स्थळांमधून शहराचा सामाजिक सलोखा दिसतो, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून स्वराज्याची प्रेरणा जागी होते, जुने मार्केट शहराच्या ऐतिहासिक आणि व्यापारी वाटचालीची आठवण करून देते, तर समुद्रकिनारा अलिबागच्या भौगोलिक आणि पर्यटन ओळखीचे प्रतीक आहे. त्यामुळे नगरपरिषद कार्यालयापासून समुद्रकिनाऱ्यापर्यंतचा हा प्रवास एका अर्थाने ‘अलिबागच्या ओळखीचा तिरंगा प्रवास’ ठरणार आहे.
विशेष म्हणजे, रॅलीच्या माध्यमातून शहरातील विविध समाजघटक, नागरिक आणि दुचाकीस्वारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यावरून धावणाऱ्या प्रत्येक दुचाकीवर फडकणारा तिरंगा हा केवळ राष्ट्रध्वज न राहता एकता, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय अभिमानाचा संदेश देणार आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सकाळी ९ वाजता नगरपरिषद कार्यालय परिसरातून सुरू होणाऱ्या या रॅलीचा शेवट समुद्राच्या साक्षीने अलिबाग बीचवर होणार आहे. म्हणजेच शहराच्या प्रशासनाच्या केंद्रापासून सुरू झालेला तिरंगा प्रवास अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर राष्ट्राभिमानाचा संदेश देत पूर्ण होईल.
नगराध्यक्षा अक्षया नाईक, उपनगराध्यक्ष मानसी म्हात्रे आणि मुख्याधिकारी सागर सांळुंखे यांच्या निमंत्रणातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन तिरंगा बाइक रॅलीचा भाग व्हावे, असे आवाहन नगरपरिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.
……



