अलीबागच्या विकासासाठी सात सूत्रांचा आराखडा शासन दरबारी; ॲड. अंकित बंगेरा यांच्या ‘व्हिजन डॉक्युमेंट’ची बावनकुळे यांनी घेतली दखल
तातडीच्या कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश; पर्यटन, सांस्कृतिक सुविधा, पुनर्विकास, रस्ते आणि ऐतिहासिक वारसा संवर्धनावर भर

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
अलीबाग शहराचा विकास तात्पुरत्या उपाययोजनांवर नव्हे, तर दीर्घकालीन नियोजनाच्या आधारे व्हावा या उद्देशाने नगरसेवक ॲड. अंकित बंगेरा यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सदिच्छा भेट घेत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार केलेले सात महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश असलेले ‘व्हिजन डॉक्युमेंट’ शासनाकडे सादर केले.
पर्यटन, सांस्कृतिक पायाभूत सुविधा, ऐतिहासिक वारसा संवर्धन, सीआरझेडमधील पुनर्विकास, वाहतूक व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्था यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश असलेल्या या प्रस्तावांची बावनकुळे यांनी सकारात्मक दखल घेत संबंधित विभागांसह रायगड जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती ॲड. अंकित बंगेरा यांनी दिली.
बैठकीत ॲड. बंगेरा यांनी अलीबागच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन शहरासाठी स्वतंत्र विकास आराखड्याची आवश्यकता अधोरेखित केली. वाढत्या पर्यटनामुळे शहरावर पडणारा ताण, नागरी सुविधांची वाढती गरज आणि नियोजनबद्ध विकासाची आवश्यकता लक्षात घेऊन विविध विकासकामांना शासनाने प्राधान्य द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
शहरातील सांस्कृतिक चळवळीला चालना मिळावी, नाट्यप्रयोग, संगीत मैफिली, कला आणि साहित्यिक कार्यक्रमांसाठी आधुनिक व सुसज्ज मिनी थिएटर उभारण्यात यावे, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली. यामुळे स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होण्यासह अलीबागची सांस्कृतिक ओळख अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पर्यटन क्षेत्राचा विचार करताना आकर्षक उद्याने, वॉक-वे, पर्यटकांसाठी आधुनिक सुविधा आणि पर्यटनस्थळांचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली. पर्यटनाभिमुख विकासामुळे स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
अलीबागच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी कुलाबा किल्ल्यावर ऐतिहासिक संग्रहालय उभारण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी इतिहासाचे संवर्धन आणि नव्या पिढीपर्यंत तो प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी हे संग्रहालय महत्त्वपूर्ण ठरेल, असे त्यांनी सांगितले.
कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी अलीबाग पोलीस ठाण्यात स्वतंत्र व सुसज्ज पोलीस कोठडी उभारण्याची मागणी करण्यात आली. त्याचबरोबर सीआरझेड क्षेत्रातील जुन्या व जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासाचा अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न सोडविण्यासाठी विशेष एफएसआय धोरण जाहीर करून पुनर्विकासाला गती देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
शहरातील वाढती लोकसंख्या, पर्यटन आणि वाहनांची संख्या लक्षात घेता प्रमुख प्रवेशमार्ग अपुरे पडत असल्याने अलीबागच्या मुख्य प्रवेश रस्त्यांचे तातडीने रुंदीकरण करण्यात यावे, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व प्रस्तावांचा सकारात्मक विचार करत संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतील, असे आश्वासन दिले. तसेच रायगड जिल्हाधिकाऱ्यांनाही या प्रस्तावांबाबत पुढील प्रक्रिया गतीने राबविण्याच्या सूचना करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
यावेळी ॲड. अंकित बंगेरा यांनी अलीबागचा विकास हा अल्पकालीन उपायांपुरता मर्यादित न राहता आगामी अनेक दशकांचा विचार करून व्हावा, यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. “अलीबागला आधुनिक, पर्यटनाभिमुख, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि नियोजनबद्ध शहर म्हणून विकसित करण्यासाठी आमचे प्रयत्न यापुढेही कायम राहतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रमुख मागण्या
अलीबागसाठी आधुनिक व सुसज्ज मिनी थिएटर उभारणे.
पर्यटनवाढीसाठी उद्याने, वॉक-वे आणि आधुनिक पर्यटन सुविधा विकसित करणे
कुलाबा किल्ल्यावर ऐतिहासिक संग्रहालय उभारणे.
अलीबाग पोलीस ठाण्यासाठी स्वतंत्र व सुसज्ज पोलीस कोठडी उभारणे
सीआरझेड क्षेत्रातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी विशेष एफएसआय धोरण लागू करणे
शहरातील प्रमुख प्रवेश रस्त्यांचे रुंदीकरण करणे
अलीबागच्या दीर्घकालीन विकासासाठी नियोजनबद्ध विकास आराखडा आणि आवश्यक शासन निधी उपलब्ध करून देणे




