ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

दोन वाटा फुटल्या होत्या, पण दिशा एकच होती… मराठी अस्मितेच्या लढाईसाठी आज ठाकरे बंधूंचं एकत्र पाऊल पडलं


मराठी माणसाला कमकुवत समजणाऱ्यांसाठी हा इशाऱ्याचा दिवस आहे. वर्षानुवर्षं मराठी मतांची फूट पाडून सत्ता उपभोगणाऱ्यांना आज ठाकरे बंधूंच्या एकजुटीने थेट झटका दिला आहे. जेव्हा महाराष्ट्राचं नेतृत्व तोडण्याचा, मुंबईचा आत्मा हिरावून घेण्याचा आणि मराठी अस्मितेला दुय्यम ठरवण्याचा प्रयत्न सुरू होता, तेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एकत्र येणं अपरिहार्य ठरलं. ही युती भावनेची नाही, ही लढाईची घोषणा आहे. मराठी माणसाच्या हक्कांसाठी, मुंबईवरच्या मालकीसाठी आणि फोडाफोडीच्या राजकारणाला कायमचा धडा शिकवण्यासाठी. आज दोन भाऊ एकत्र आले नाहीत, तर मराठी माणूस स्वतःसाठी उभा राहिला आहे, आणि हीच गोष्ट सत्ताधाऱ्यांच्या काळजात धडकी भरवणारी असल्याचे राज्यभरातील वातावरणातून दिसून येते.
——————————————————
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
मुंबई, ता, 23 : राज्यातील 29 महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जे चित्र वेगाने बदलत आहे, त्यातील सर्वात निर्णायक आणि ऐतिहासिक घडामोड म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंचं एकत्र येणं. वरळी येथील ब्लू सी बँक्वेट येथे युतीची घोषणा करताना केवळ दोन पक्ष नाही, तर दोन दशकांपासून विभागलेली मराठी राजकीय ताकद पुन्हा एकत्र येत असल्याचं चित्र दिसून आलं. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह सात महापालिकांमध्ये एकत्र लढण्याचा निर्णय हा योगायोग नसून, मराठी माणसाचं नेतृत्व कमकुवत करण्याच्या प्रयत्नांना दिलेला थेट आणि ठोस प्रतिउत्तर आहे.
मुंबई महानगरपालिकेतील संभाव्य जागावाटप पाहिलं, तर ही युती पूर्ण विचार करून उभी राहिल्याचं स्पष्ट होतं. मनसे 65 ते 70 जागांवर, तर शिवसेना (यूबीटी) 145 ते 150 जागांवर लढण्याची शक्यता आहे. या आकड्यांमागे केवळ निवडणूक गणित नसून, “मराठी मतांची फूट थांबली पाहिजे” ही ठाम भूमिका आहे. गेल्या काही वर्षांत मराठी मतं विभागली जावीत आणि त्याचा फायदा भाजप व त्यांच्या मित्रपक्षांना व्हावा, असं राजकारण जाणीवपूर्वक केलं गेलं. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे ही खेळी मोडीत निघण्याची शक्यता आहे, आणि त्यामुळेच सत्ताधाऱ्यांमध्ये अस्वस्थता दिसून येते.
दोन भाऊ भांडले, वेगळे झाले, एकमेकांवर कठोर शब्दांत टीका केली. हे सगळं मराठी माणसाने पाहिलं आहे आणि विसरलेलंही नाही. त्यामुळेच आज त्याच्या मनात एकाच वेळी अनेक प्रश्न आहेत. “इतकी वर्षं दुरावलेले भाऊ अचानक एकत्र का आले?” हा प्रश्न जितका खरा आहे, तितकीच खरी भावना अशीही आहे की “जर हे एकत्र येणं महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी असेल, तर जुन्या जखमा मागे टाकल्या पाहिजेत.” मराठी मतदार आज इतका अपरिपक्व नाही की तो केवळ कौटुंबिक वादांच्या चष्म्यातून या घडामोडीकडे पाहील. तो हे समजून घेतो आहे की भांडणं खासगी होती, पण आजची एकजूट ही सार्वजनिक हितासाठी आहे.
याच मुद्द्यावर विरोधक ठाकरे बंधूंना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “दोन्ही ठाकरे एकत्र आले तरी मराठी माणूस त्यांना मतदान करणार नाही” असं सांगत या युतीला कमी लेखण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आघाड्या सत्तेसाठी असतात, पण शिवसेना-भाजपाची युती विकासासाठी आहे, असं म्हणत ठाकरे बंधूंच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मात्र या प्रतिक्रियाच दर्शवतात की भाजपाला आणि सत्ताधाऱ्यांना या युतीची खरी भीती काय आहे.
ही युती म्हणजे भाजपाच्या त्या राजकारणाला बसलेली चपराक आहे, ज्यात महाराष्ट्रात बाहेरच्या शक्तींनी स्थानिक नेतृत्व फोडून, मराठी अस्मितेला दुय्यम ठरवण्याचा प्रयत्न केला. मुंबईवरचा मराठी माणसाचा हक्क, महाराष्ट्राच्या सत्ताकेंद्रात मराठी नेतृत्वाची भूमिका आणि स्थानिक प्रश्नांवर आधारित राजकारण हे सगळं पुन्हा केंद्रस्थानी येण्याची शक्यता ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे निर्माण झाली आहे. त्यामुळे ही युती केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून, ती मराठी स्वाभिमानासाठी उभी राहिलेली राजकीय लढाई आहे.
एकूणच पाहता, ठाकरे बंधूंचं एकत्र येणं हे भावनिक चित्र नक्कीच आहे, पण त्याहून अधिक ते काळाची गरज आहे. मराठी माणूस आता कोणाच्या टोमण्यांवर किंवा टीकेवर नव्हे, तर आपल्या अस्तित्वाच्या प्रश्नावर निर्णय घेणार आहे. जर ही एकजूट मतपेटीतही उतरली, तर येणाऱ्या महापालिका निवडणुका केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांची लढाई न राहता, महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारा टर्निंग पॉइंट ठरू शकतात.
……

Related Articles

Back to top button