ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्रमुंबईरायगड
संगीत देवबाभळी’ कोकण दौऱ्यावर, १३ नोव्हेंबर रोजी अलिबागमध्ये पहिल्या प्रयोगाने कोकण दौऱ्याची सुरुवात

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग : भारतीय रंगभूमीवरील एक अविस्मरणीय मास्टरपीस, ७०० हून अधिक प्रयोगांची यशस्वी नोंद करणारे आणि १००० व्या प्रयोगाच्या दिशेने वेगाने वाटचाल करणारे नाटक ‘संगीत देवबाभळी’ आता १३ नोव्हेंबर रोजी अलिबागमध्ये पहिल्या प्रयोगाने कोकण दौऱ्याची सुरुवात करणार आहे, अशी माहिती नाट्यप्रेमी संदीप गोठीवरेकर यांनी दिली.
कोकणवासीय रसिकांना या नाटकातून संगीत, नाट्य आणि मनोरंजनाची एक अद्वितीय मेजवानी अनुभवायला मिळणार आहे.
‘संगीत देवबाभळी’— मराठी रंगभूमीवरील सांस्कृतिक चमत्कार पुन्हा एकदा कोकणात उजळणार आहे! देवबाभळीचा जादुई अनुभव चुकवू नका, तुमच्या शहरात, तुमच्या रंगमंचावर, असे आवाहन गोठीवरेकर यांनी केले आहे.
‘भद्रकाली प्रॉडक्शन्स’ची ५५ वी विठूसावळी नाट्यकृती, प्रसाद कांबळी यांच्या सादरीकरणातून, लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेले हे नाटक पुन्हा एकदा रसिकांच्या हृदयात देवबाभळीची गोड झुळूक आणणार आहे.
या नाटकाद्वारे प्राजक्त देशमुख (लेखक-दिग्दर्शक), आनंद ओक (संगीतकार), प्रफुल्ल दीक्षित (प्रकाशयोजना) आणि शुभांगी सदावर्ते (अभिनेत्री) यांचे मराठी रंगभूमीवरील पदार्पण झाले.
लखुबाईच्या भूमिकेत मानसी जोशी, तर आवलीच्या भूमिकेत शुभांगी सदावर्ते आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत आहेत.
अलीकडेच या नाटकाने पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात सलग हाऊसफुल्ल प्रयोगांची झंकार घातली. त्यानंतर बेळगाव आणि बेंगळुरू येथे कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने सादर झालेल्या प्रयोगांनाही अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
आता सुरू झाला आहे —
‘देवबाभळी महाराष्ट्र दौरा’
ज्यात नाशिकनंतर देवबाभळीचा ताफा कोकणात दाखल होत आहे.
दौऱ्याचे वेळापत्रक:
१३ नोव्हेंबर – अलिबाग
१४ नोव्हेंबर – महाड
१५ नोव्हेंबर – चिपळूण
१६ नोव्हेंबर – रत्नागिरी
१७ नोव्हेंबर – कुडाळ
१८ नोव्हेंबर – वेंगुर्ला
१९ नोव्हेंबर – सावंतवाडी
२० नोव्हेंबर – कणकवली
—




