ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
कागदावरचा ‘विकास’ हरवला, तर जमिनीवरचा ‘विकास’ फरार — सत्ताधाऱ्यांचा बुरखा फाटला

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : जिल्ह्यात सत्ताधाऱ्यांकडून विकासाच्या ढोलताशांचा गजर सुरू असला, तरी हा तथाकथित विकास आज कागदांपुरताच मर्यादित राहिल्याचे स्पष्ट होत आहे. रस्ते, पाणी, रोजगार आणि कायदा-सुव्यवस्था या मूलभूत प्रश्नांवर जिल्हा आजही तसाच मागे आहे. इतकेच नव्हे, तर विकास हा शब्द जसा जमिनीवर दिसत नाही, तसाच शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले हा देखील निवडणूक काळातील गंभीर मारहाण प्रकरणानंतर फरार झाल्याने सत्ताधाऱ्यांच्या दाव्यांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महाड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान २ डिसेंबर २०२५ रोजी मतदानाच्या दिवशी शहरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये राजकीय वादाचे रूपांतर थेट हिंसाचारात झाले. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप असून या प्रकरणात विकास गोगावले यांच्यासह तब्बल २९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गंभीर बाब म्हणजे, गुन्हा दाखल होऊनही आजपर्यंत मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. विकास गोगावले गेल्या २४ दिवसांपासून फरार असल्याची माहिती समोर आली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नाना जगताप हेही या मारहाण प्रकरणानंतर पसार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणात विकास गोगावले यांनी अटकपूर्व जामिनासाठी माणगाव न्यायालयात दोन वेळा अर्ज केला, मात्र दोन्ही वेळा न्यायालयाने तो फेटाळला. यानंतर मुंबई न्यायालयानेही अटकपूर्व जामीन नाकारल्याने आरोपींच्या अडचणी वाढल्या आहेत. न्यायालयाच्या कठोर भूमिकेनंतरही आरोपी फरार असणे, हे सत्तेच्या छत्रछायेखाली कायदा कितपत प्रभावी आहे, असा सवाल उपस्थित करत आहे.
नेमकं प्रकरण काय?
महाड नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेनंतर दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या. मात्र, न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतरही आरोपींचा थांगपत्ता न लागणे, तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करणारे ठरत आहे.
दरम्यान, राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून रायगडच्या पालकमंत्रीपदावरून भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यातील राजकीय संघर्ष उघडपणे दिसून येत आहे. कार्यकर्ते फोडाफोडीपासून ते थेट निवडणूक काळातील राड्यापर्यंत हा संघर्ष पोहोचल्याचे चित्र आहे.
एकीकडे जिल्ह्याच्या विकासाच्या बाता, तर दुसरीकडे गुन्हे दाखल असूनही आरोपी फरार—या विरोधाभासामुळे रायगडमध्ये विकास नेमका कुणासाठी? असा सवाल आता सामान्य नागरिक विचारू लागला आहे. विकास कागदावरच राहणार की प्रत्यक्ष जमिनीवर उतरणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
…..




