“साखर कारखान्यांपासून पतसंस्थांपर्यंत… महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र आता ‘प्रोफेशनल मोड’मध्ये जाणार?”
रामफेड व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचा सामंजस्य करार; प्रशिक्षण, व्यवस्थापन आणि क्षमता विकासावर भर

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र आता केवळ निवडणुका, राजकारण आणि पारंपरिक कारभारापुरते मर्यादित न राहता व्यावसायिक व्यवस्थापन, प्रशिक्षण आणि तांत्रिक कौशल्याच्या नव्या टप्प्यात प्रवेश करत असल्याचे संकेत रामफेड रायगड जिल्हा एम पॅक्स सेवा सहकारी संस्थांचा महासंघ मर्यादित, अलिबाग आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यांच्यात झालेल्या सामंजस्य करारातून मिळत आहेत.
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अलिबाग येथे आयोजित विशेष कार्यक्रमात हा करार करण्यात आला. या कराराअंतर्गत सहकारी संस्थांचे संचालक, पदाधिकारी, कर्मचारी आणि सभासद यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण व क्षमता विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. सहकार क्षेत्रातील कायदे, लेखापरीक्षण, आर्थिक शिस्त, प्रशासन आणि व्यवस्थापन कौशल्य यांवर सखोल प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.
विशेष म्हणजे, शेतकरी उत्पादक संस्था (FPO), स्वयं-सहायता गट, ग्रामीण भागातील सहकारी संस्था तसेच नव्याने संस्था स्थापन करू इच्छिणाऱ्या गटांनाही या प्रशिक्षण प्रक्रियेशी जोडण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रात “अनुभवाधारित कारभार” ऐवजी “प्रशिक्षित व्यवस्थापन” ही संकल्पना अधिक मजबूत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत अभ्यासक्रम निर्मिती, तांत्रिक मार्गदर्शन, गुणवत्ता नियंत्रण आणि सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर रामफेडतर्फे प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, दैनंदिन व्यवस्थापन, प्रशिक्षणार्थी नोंदणी आणि स्थानिक समन्वयाची जबाबदारी सांभाळली जाणार आहे.
या कार्यक्रमास जयंतभाई पाटील माजी आमदार तथा अध्यक्ष, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तीटकारे, विभागीय समन्वयक अरुण काकडे, डॉ. भास्कर पाटील, प्रशांत चासकर, रामफेडचे चेअरमन निनाद विकास पाटील तसेच सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
सहकार क्षेत्रात बदलत्या काळानुसार व्यवस्थापन कौशल्य, कायदेशीर समज आणि आर्थिक शिस्त अत्यावश्यक बनत असताना हा उपक्रम भविष्यात महाराष्ट्रातील सहकारी संस्थांसाठी दिशादर्शक ठरू शकतो, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.




