ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

रायगडमध्ये मतांचा विजय, पण सत्तेचा पराभव! शिंदे सेना सर्वात मोठा पक्ष ठरूनही सत्ते बाहेर? राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला स्पष्ट बहुमत, शेकापक्षाच्या वैभवशाली साम्राज्याला हादरा !


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
आविष्कार देसाई
अलिबाग 
रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर होताच जिल्ह्याच्या राजकारणात अक्षरशः भूकंप झाला आहे. 21 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेला शिवसेना शिंदे गट सत्तेच्या दारात उभा आहे; पण सत्तेची चावी मात्र त्यांच्या हातात जाणार की नाही, हा आता खरा प्रश्न आहे.
कारण आकडे वेगळेच सांगत आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेस (16) आणि भाजप (15) या निवडणूकपूर्व युतीच्या जागांची बेरीज 31 होते, आणि बहुमतासाठी लागतो फक्त 30 चा आकडा! म्हणजेच सर्वाधिक जागा जिंकूनही सत्तेपासून दूर राहण्याची वेळ शिंदे गटावर येण्याची शक्यता प्रबळ झाली आहे.
रविवारी सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉमने व्यक्त केलेला अंदाज आता प्रत्यक्षात उतरताना दिसतो आहे. शिंदे गटाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजप-राष्ट्रवादीमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
तटकरे विरुद्ध शिंदे गट : वैयक्तिक वैर की राजकीय डाव?
खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यातील तणाव सर्वश्रुत आहे. या मतभेदांचा फायदा घेत राष्ट्रवादीचे नेतृत्व शिंदे गटाला सत्तेपासून रोखण्याचा प्रयत्न करणार, अशी जोरदार चर्चा आहे.
राजकीय सूत्रांचे म्हणणे स्पष्ट आहे की, “सत्ता मिळवण्यापेक्षा शिंदेंना सत्ता मिळू न देणे” हा सध्या काहींचा मोठा अजेंडा बनला आहे.
शेकाप साम्राज्याचा अंत, अहंकाराची राजकीय किंमत!
या निवडणुकीत सर्वात मोठा धक्का बसला तो एकेकाळी रायगडवर निर्विवाद वर्चस्व असलेल्या राजकीय साम्राज्य उपभोगलेल्या शेतकरी कामगार पक्षाला. एकही उमेदवार निवडून आणता न आल्याने पक्ष अक्षरशः शून्यावर आला आहे.
अलिबागमध्ये महेंद्र दळवी यांचा राजकीय काटा काढण्याच्या नादात आणि भाजपला जिल्ह्यात रोखण्याच्या तीव्र भावनेत शेकापक्षाने स्वतःचाच राजकीय पाया उपटून टाकला, अशी तीव्र प्रतिक्रिया कार्यकर्त्यांतून उमटते आहे.
एकेकाळी “शेतकरी भवनातून मुख्यमंत्री” अशी वल्गना करणारे शेकापक्षाचे नेतृत्व आज खामोश का आहे ? हा प्रश्न आता पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनाच पडला आहे.
अध्यक्षपदाची समीकरणे बदलली
शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी या भरघोस मताधिक्याने विजयी झाल्या आणि अध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदार मानल्या जात होत्या. मात्र नव्या राजकीय समीकरणांनी त्यांचे स्वप्न सध्या तरी अधांतरी गेले आहे.
पुढे काय?
भाजप-राष्ट्रवादी सत्ता स्थापन करणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, परंतु काठावर बहुमत न ठेवता राष्ट्रवादी आणि भाजप  इतर घटकांची चाचपणी करत असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे . तर दुसरीकडे, सत्तेबाहेर राहिल्यास शिंदे गट रायगडमध्ये सर्वात आक्रमक विरोधी पक्ष म्हणून उभा राहील, अशी चर्चा सुरू झाली आहे.
रायगडमध्ये आता खरी निवडणूक निकालानंतर सुरू झाली आहे…जिंकणारा कोण, आकडे की डावपेच?
….
तालुकानिहाय चित्र 
अलिबाग : 7 पैकी 6 शिंदे, 1 राष्ट्रवादी
महाड : 5 पैकी 5 शिंदे
पोलादपूर : 2 पैकी 2 शिंदे
मुरुड : 2 पैकी 2 शिंदे
रोहा : 2 शिंदे, 2 राष्ट्रवादी
माणगाव : 2 शिंदे, 2 राष्ट्रवादी
तळा / श्रीवर्धन / म्हसळा : राष्ट्रवादी वर्चस्व
पनवेल : भाजपचा झेंडा
उरण : काँग्रेस-उबाठा उपस्थिती
अंतिम आकडे
शिवसेना (शिंदे) — 21
राष्ट्रवादी काँग्रेस — 16
भाजप — 15
शिवसेना (उद्धव) — 5
काँग्रेस — 2
शेकाप — 0

Related Articles

Back to top button