ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

‘सचिन अहिरांची गुगली’; सहा खासदारांनंतर आणखी ‘षटकार’, शिवसेना वाढवण्यासाठीच जोडतोय – एकनाथ शिंदे

विधान परिषद उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल; सचिन अहिरांचे शिवसेनेत स्वागत करत उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता जोरदार निशाणा


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

मुंबई  |

सचिन अहिर यांच्या शिवसेनेतील प्रवेशाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला. “गेल्या आठवड्यात सहा खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला, आता सचिन अहिर यांच्या रूपाने आणखी एक षटकार लगावला आहे. हे सत्र सुरूच राहणार आहे,” असे सांगतानाच शिवीगाळ करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल, रंग बदलणारे नेते महाराष्ट्राने पाहिले आहेत, पुतना मावशीचे प्रेम दाखवू नका आणि आत्मपरीक्षण करा, अशा शब्दांत शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर सलग निशाणा साधला. त्याचवेळी विकासाचा अजेंडा, महायुतीची ताकद आणि शिवसेनेत वाढता प्रवेश यावरही त्यांनी सविस्तर भाष्य केले. मुंबई येथील बाळासाहेब भवन येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिंदे म्हणाले, सचिन अहिर हे तीन वेळा विधानसभेचे आमदार राहिले असून सध्या ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. राज्यमंत्री म्हणून सात विभागांची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. गिरणी कामगार, कोळी बांधव, भूमिपुत्र, सर्वसामान्य मुंबईकर आणि कामगारांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करणारे ग्रासरूट स्तरावरील नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक कामगार संघटनांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या असून, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
सचिन अहिर यांनी आज महायुतीचे उमेदवार म्हणून विधान परिषद उपसभापतीपदाचा अर्ज दाखल केला असून, महायुतीला विधानसभेसह विधान परिषदेतही स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे उद्या प्रस्तावाद्वारे त्यांची उपसभापतीपदी निवड होईल, असा विश्वास व्यक्त करत शिंदे म्हणाले की, ते केवळ मुंबईपुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रातील सदस्यांना न्याय देण्याचे काम करतील. त्यांच्या आगमनामुळे मुंबई, पुणे आणि राज्यातील कामगार क्षेत्रात शिवसेनेची ताकद आणखी वाढेल.
“शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मुख्यमंत्री असतानाही मी कार्यकर्ता म्हणूनच काम केले आणि आजही कार्यकर्ताच आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान करणाऱ्या पक्षात काम करण्याचा निर्णय सचिन अहिर यांनी घेतला आहे. टीम म्हणून काम करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे त्यांचे मनःपूर्वक स्वागत करतो,” असे शिंदे म्हणाले.
२०२२ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा जपत आम्ही उठाव केला आणि राज्यात सत्तांतर घडवून आणले, अशी आठवण करून देताना शिंदे म्हणाले की, ३० जून २०२२ रोजी मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती आणि आजही तो दिवस योगायोगाने महत्त्वाचा ठरला आहे. मुख्यमंत्री म्हणून काम करताना अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या प्रकल्पांना गती दिली. महाविकास आघाडीच्या काळात विकासकामांना ब्रेक लागला होता; आम्ही तो दूर केला. महाराष्ट्राला पायाभूत सुविधा, जीडीपी, स्टार्टअप आणि विकासाच्या विविध क्षेत्रांत क्रमांक एकवर नेले. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’सह अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आणि त्याच कामावर विश्वास ठेवून जनतेने महायुतीला पुन्हा स्पष्ट बहुमत दिले.
लोक शिवसेनेवर विश्वास दाखवत आहेत, कारण आम्ही दिलेला शब्द पाळतो. आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांशी प्रामाणिक आहोत. शब्दाला किंमत देणारी संघटना म्हणूनच लोक स्वतःहून शिवसेनेत येत आहेत, असे शिंदे म्हणाले.
गेल्या आठवड्यात सहा खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला. खासदार हा २० ते २५ लाख मतदारांचे प्रतिनिधित्व करणारा लोकप्रतिनिधी असतो. प्रत्येकाने एकच भावना व्यक्त केली की, मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे. संकटात आणि विकासकामांमध्ये आपल्या पाठीशी उभा राहणारा नेता हवा असतो. त्यामुळेच अनेक लोकप्रतिनिधी शिवसेनेकडे येत आहेत, असे त्यांनी सांगितले.
“आम्ही कुठलेही तोडफोडीचे राजकारण करत नाही. आम्ही जोडण्याचे काम करतो. काही जण तोडायला निघाले आहेत, आम्ही शिवसेना वाढवायला निघालो आहोत. आमची भूमिका सकारात्मक आणि व्यावहारिक आहे. आमचा अजेंडा खुर्चीचा नाही, तर विकासाचा आहे,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
शेतकरी, कष्टकरी, वारकरी, कामगार, महिला, ‘लाडक्या बहिणी’ आणि युवक यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आम्ही काम केले. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात झालेला विकास सर्वांसमोर आहे. अटल सेतू, मेट्रो, कारशेड, समृद्धी महामार्ग, विविध पायाभूत सुविधा प्रकल्प यामुळे राज्याचा विकास वेगाने होत आहे, असे त्यांनी सांगितले.
राज्यातील डबल इंजिन सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे भक्कम सहकार्य मिळत असल्याचे सांगत शिंदे म्हणाले की, यूपीए सरकारच्या तुलनेत मोदी सरकारने महाराष्ट्राला दहा वर्षांत तब्बल १२ लाख कोटी रुपयांचा निधी दिला. त्यामुळे गुंतवणूक, पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी, कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळाली आहे.
राज्यात गुंतवणूक वाढत असून, लोकप्रतिनिधींना आपल्या मतदारसंघाचा विकास हवा आहे. त्या विकासासाठी ते महायुती आणि शिवसेनेकडे येत आहेत. मात्र काही लोक त्यावर टीका करत आहेत. “आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट” अशी त्यांची भूमिका असल्याचा टोला शिंदे यांनी लगावला.
“आम्ही सर्वसामान्य माणसाच्या जीवनात बदल घडवण्याचा विचार घेऊन पुढे जात आहोत. विकासाच्या अजेंड्यावरच आमची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे लोक आमच्याकडे येत आहेत,” असे त्यांनी सांगितले.
सचिन अहिर यांचे पुन्हा एकदा स्वागत करताना शिंदे म्हणाले, “सचिनभाऊ अष्टपैलू आहेत. त्यांनी आज गुगली टाकली आहे. ग्रासरूटचा कार्यकर्ता आज शिवसेनेसोबत आला आहे. त्यांचे मनापासून अभिनंदन करतो.”
“एकनाथ शिंदे जे करतात ते फुलप्रूफ करतात,” असे म्हणत त्यांनी मिश्कीलपणे आणखी एका राजकीय घडामोडीचे संकेत दिले. “कोणते आमदार आमच्या संपर्कात आहेत, हे मी आज सांगितले तर उद्या तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळणार नाही,” असे म्हणत त्यांनी सूचक विधान केले.
‘ऑपरेशन टायगर’बाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. “२०१९ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल ५० फोन केले, पण एकही फोन उचलला गेला नाही. एकत्र राहू, अशी भाषा करणारेच नंतर फडणवीस यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यापर्यंत आणि त्यांच्या सागर बंगल्यावर पोलिस पाठवण्यापर्यंत गेले. आता मात्र त्यांना अचानक पुतना मावशीचे प्रेम आले आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
“हे मगरमच्छाचे अश्रू आहेत. देवेंद्र फडणवीस त्यांना चांगले ओळखतात. एवढ्या वेगाने रंग बदलणारा नेता मी पाहिलेला नाही. शिव्या देण्यापेक्षा आणि शिवसेनेविरोधात वातावरण तयार करण्यापेक्षा त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे,” अशा शब्दांतही शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष हल्ला चढवला.

यावेळी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, खासदारांच्या मतदारसंघांमध्ये त्यांना शिव्या देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ही आपली परंपरा नाही. महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची आणि संतांची भूमी आहे. त्यामुळे अशा प्रकारे शिवीगाळ करणाऱ्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. जाणाऱ्यांना शिव्या देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.
याप्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक,
….


Related Articles

Back to top button