ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
श्री समर्थ विचार फाउंडेशनच्या ‘आद्य नाईक स्मृती’ गणेश सजावट स्पर्धेत अनिल, सानिया प्रथम
पहलगामच्या शौर्यापासून ‘बदलती चाळ संस्कृती’पर्यंत; ८६ स्पर्धकांची कल्पकतेची झेप

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
कुठे पहलगाम हल्ल्याला भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्युत्तराचा थरार, तर कुठे काळाच्या ओघात हरवत चाललेल्या चाळ संस्कृतीचे हळवे चित्रण… गणेश सजावटीतून सामाजिक आशय, देशभक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देत अलिबाग तालुक्यातील तब्बल ८६ स्पर्धकांनी कल्पकतेचा जागर घडवला. श्री समर्थ विचार फाउंडेशन रायगड आयोजित ‘आद्य नाईक स्मृती गणेश सजावट स्पर्धा २०२६’ मध्ये मोठे शहापूर येथील अनिल दिलीप पाटील यांनी मुख्य गणेश सजावट गटात, तर माणकुळे येथील सानिया कृष्णा पाटील यांनी ‘टाकाऊतून टिकाऊ’ गटात प्रथम क्रमांक पटकावला.
अनिल पाटील यांनी पहलगाम हल्ला आणि त्याला भारतीय सैन्याने दिलेले प्रत्युत्तर हा विषय देखाव्यातून प्रभावीपणे साकारला. देशभक्ती आणि शौर्याचा संदेश देणाऱ्या या देखाव्याने लक्ष वेधून घेतले. दुसरीकडे, सानिया पाटील यांनी ‘बदलती चाळ संस्कृती’ हा विषय टाकाऊ वस्तूंच्या कल्पक पुनर्वापरातून उभा करत बदलत्या सामाजिक जीवनशैलीचे दर्शन घडवले.

गणेशोत्सवातील सजावट केवळ आकर्षक देखाव्यापुरती मर्यादित न ठेवता त्यातून देशभक्ती, सामाजिक प्रश्न, पर्यावरण संवर्धन आणि बदलत्या जीवनशैलीचे प्रतिबिंब उमटावे, हा स्पर्धेचा विशेष ठरला. गावागावांतून आलेल्या स्पर्धकांनी विविध विषयांवर देखावे साकारत आपल्या कलागुणांसोबतच सामाजिक जाणीवेचेही दर्शन घडवले.
विशेषतः ‘टाकाऊतून टिकाऊ’ या गटाला मिळालेल्या प्रतिसादातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना अधिक ठळक झाली. टाकाऊ वस्तूंचा कलात्मक आणि अर्थपूर्ण वापर करून स्पर्धकांनी सजावटीला वेगळे परिमाण दिले.

गट क्रमांक १ : अनिल पाटील अव्वल
मुख्य गणेश सजावट गट
प्रथम : अनिल दिलीप पाटील, शहापूर
द्वितीय : संतोष पाटील आणि पाटील परिवार, नारंगी-चिंचवली
तृतीय : विष्णू मोकल, सुरकीचापाडा, हाशिवरे
चतुर्थ : वर्षा योगेश पाटील, खिडकी
पाचवा : भाग्येश किरण म्हात्रे, केतकीचा मळा
उत्तेजनार्थ : जयेश गंगाधर ठाकूर, हाशिवरे, शशिकांत शंकर म्हात्रे, कावाडे, सुशांत संजय ठाकूर, माणकुळे, वैष्णवी रणजित पाटील, शेखाचेगाव आणि निहार सचिन पाटील, विरवाडी
गट क्रमांक २ : ‘टाकाऊतून टिकाऊ’मध्ये सानिया पाटील प्रथम
प्रथम : सानिया कृष्णा पाटील, माणकुळे
द्वितीय : विपुल ज्ञानेश्वर पाटील, शेखाचेगाव
तृतीय : अर्जुन काशिनाथ गावंड, फोफेरी
चतुर्थ : रविंद्र देवराम पाटील, बहिरीचा पाडा
पाचवा : चक्रपाणी मोहन पाटील, पेझारी
उत्तेजनार्थ : पंकज वसंत म्हामे, हाशिवरे, सचिन सिताराम कडवे, सारळ आणि मिलिंद गजानन पाटील, सातघर
विशेष संदेश देणाऱ्या देखाव्यांचाही सन्मान
‘पाटील टेंडर्स’ यांच्यावतीने ‘टाकाऊतून टिकाऊ’ संकल्पनेतून विशेष सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांसाठी स्वतंत्र पारितोषिके देण्यात आली. यामध्ये सचिन सिताराम कडवे (सारळ), रविंद्र देवराम पाटील (बहिरीचा पाडा) आणि चक्रपाणी मोहन पाटील (पेझारी) यांचा गौरव करण्यात आला.
स्पर्धेचे परीक्षण जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे सुरेश पाटील, ज्येष्ठ पत्रकार आविष्कार देसाई, दैनिक कृषिवलचे सहयोगी संपादक सुयोग आंग्रे, लहू पाटील आणि ॲड. रत्नाकर पाटील यांनी केले.
विजेत्यांना जिल्हा परिषद सदस्य अमित नाईक, ॲड. प्रवीणदादा ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार आविष्कार देसाई, हाशिवरे हायस्कूलचे मुख्याध्यापक बी. बी. गायकवाड, माजी सरपंच रणजित पाटील, बालनाथ धोंदरे, आशाबाई पाटील, गणेश म्हात्रे, प्रवीण पाटील आणि नरेंद्र पाटील यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री समर्थ विचार फाउंडेशन रायगडचे अध्यक्ष ॲड. रत्नाकर पाटील यांनी केले. निलेश ठाकूर यांनी रंगतदार सूत्रसंचालन केले, तर ॲड. विजय पाटील यांनी आभार मानले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी फाउंडेशनचे पदाधिकारी तसेच एकविरा मित्र मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
गणेशोत्सवाला मिळाले सामाजिक भान
गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कलागुणांना व्यासपीठ देणे, सामाजिक विषयांकडे लक्ष वेधणे आणि पर्यावरणपूरक सजावटीचा संदेश पोहोचवणे, या उद्देशाने आयोजित ही स्पर्धा केवळ सजावटीची स्पर्धा न ठरता गावागावातील कल्पकता, सामाजिक जाणीव आणि कलात्मकतेचे व्यासपीठ ठरली. भक्तीच्या उत्सवाला सामाजिक आशयाची आणि कलात्मकतेला लोकजागृतीची जोड देणारा हा उपक्रम अलिबाग तालुक्यात विशेष लक्षवेधी ठरला.
……




