ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
डोळ्यांचा ‘मूक’ शत्रू काचबिंदू; विद्यासनतर्फे अलिबागमध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
काचबिंदू (ग्लोकोमा) या डोळ्यांच्या गंभीर पण अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या आजाराबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विद्यासन एज्युकेशन फाउंडेशन, अलिबाग यांच्या वतीने विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शनिवार, १४ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता पीएनपी नाट्यगृह, अलिबाग येथे पार पडणार असून राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स यांचे सहकार्य लाभले आहे.
विद्यासन एज्युकेशन फाउंडेशन ही संस्था अलिबाग परिसरात शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यविषयक जागरूकतेसाठी विविध उपक्रम राबवत आहे. समाजात आरोग्याबाबत सजगता निर्माण करण्याच्या उद्देशाने संस्थेतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

काचबिंदू हा डोळ्यांचा एक असा आजार आहे की ज्याची सुरुवातीला लक्षणे फारशी जाणवत नाहीत. त्यामुळे अनेक रुग्णांना त्याची कल्पना उशिरा येते. वेळेवर निदान व उपचार न झाल्यास दृष्टी कमी होऊन अंधत्व येण्याचा धोका निर्माण होतो. मात्र नियमित नेत्रतपासणी आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे.
जागतिक स्तरावर काचबिंदूविषयी जागरूकता वाढवण्यासाठी जागतिक ग्लोकोमा संघटनेतर्फे दरवर्षी ८ ते १४ मार्च या कालावधीत जागतिक काचबिंदू सप्ताह साजरा केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर अलिबागमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात ग्लोकोमा तज्ज्ञ डॉ. रिटा धामणकर आणि नेत्रतज्ज्ञांची टीम काचबिंदूविषयी मार्गदर्शन करणार असून नागरिकांना या आजाराबाबत महत्त्वाची माहिती दिली जाणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
……




