सत्तेच्या पुरुषप्रधान रिंगणात महिलामंत्र्याचा ठसा; टॉप-५ मध्ये आदिती तटकरेच!
चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, उदय सामंत यांच्यासह प्रकाश आबिटकर यांचा टॉप-परफॉर्मर्समध्ये समावेश

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
मुंबई : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाला एक वर्ष पूर्ण होत असताना राज्यातील पत्रकारांनी केलेल्या मूल्यमापनातून काही सकारात्मक बाबी ठळकपणे समोर आल्या आहेत. ‘महाराष्ट्र दिनमान’ वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनलतर्फे राज्यभरातील ५० पत्रकारांच्या सहभागातून करण्यात आलेल्या या सर्व्हेमध्ये काही मंत्र्यांनी आपल्या खात्यांमध्ये प्रभावी कामगिरी करत प्रशासनावर पकड आणि निर्णयक्षमतेची छाप पाडल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. विविध जिल्हे, मंत्रालय आणि फिल्डवर काम करणाऱ्या पत्रकारांचा सहभाग असल्याने या पाहणीला तटस्थतेचे अधिष्ठान लाभले आहे.
या मूल्यमापनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार आणि उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. प्रशासनातील निर्णयप्रक्रिया, कामाचा वेग आणि खात्यांवरील नियंत्रण या निकषांवर हे मंत्री सरस ठरल्याचे पत्रकारांचे मत आहे. त्यांच्यासोबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही चांगले गुण मिळवत कामगिरीत आघाडी घेतली आहे.

याशिवाय काही मंत्र्यांनी किमान उत्तीर्णाची पातळी गाठत पुढील काळात अधिक चांगली कामगिरी करण्याची क्षमता असल्याचे संकेत दिले आहेत. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याबाबत सर्वसामान्यांसाठीची उपलब्धता हा एक महत्त्वाचा सकारात्मक मुद्दा म्हणून पुढे आला आहे. या निकषावर मिळालेल्या गुणांमुळे प्रशासन आणि नागरिकांमधील संवाद अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाबाबतही या सर्व्हेमध्ये सकारात्मक मत नोंदवण्यात आले आहे. एकूण गुणांमध्ये ते सर्वाधिक पुढे असून सरकार चालविण्याची दिशा आणि निर्णयक्षमता या बाबी पत्रकारांनी अधोरेखित केल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबाबतही प्रशासनातील अनुभव आणि लोकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता ही जमेची बाजू असल्याचे मत व्यक्त झाले आहे.
एकूणच हा सर्व्हे म्हणजे सरकारच्या कामगिरीवर केलेली टीका नसून सकारात्मक दिशा दाखवणारा आरसा असल्याचे चित्र आहे. काही मंत्र्यांनी उदाहरण घालून दिले असून उर्वरित मंत्र्यांसाठी पुढील काळात कामगिरी सुधारण्याची स्पष्ट संधी या पाहणीतून समोर आली आहे. योग्य नियोजन, लोकांशी थेट संवाद आणि खात्यांवर अधिक लक्ष दिल्यास येत्या वर्षात मंत्रिमंडळाची एकूण कामगिरी अधिक प्रभावी होऊ शकते, असा आशावाद या मूल्यमापनातून व्यक्त करण्यात आला आहे.



