ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

रायगडच्या ३१५ अंगणवाड्या ‘स्मार्ट’ बनणार; बालविकासाच्या नव्या युगाची सुरुवात – मंत्री आदिती तटकरे  यांची माहिती 


सत्यमेव जयते न्यू डॉट कॉम 

मुंबई : राज्यातील लहानग्यांचे बालपण अधिक उज्ज्वल आणि सशक्त करण्याच्या दिशेने महिला व बालविकास विभागाने मोठे पाऊल उचलले आहे. अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी शासनाच्या “स्मार्ट अंगणवाडी योजना”ला गती देत रायगड जिल्ह्यातील तब्बल ३१५ नवीन अंगणवाड्यांना मंजुरी देण्यात आली आहे. अत्याधुनिक “स्मार्ट अंगणवाडी किट”सह या केंद्रांचे रूपांतर आदर्श आणि आधुनिक अंगणवाड्यांमध्ये होणार असून, ही योजना ग्रामीण आणि शहरी भागातील बालविकासाचा नवा अध्याय ठरणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मा. आदिती तटकरे यांनी दिली.
या योजनेअंतर्गत अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण करून त्यांना शिक्षण, आरोग्य, पोषण, स्वच्छता आणि बालसंगोपनासाठी आवश्यक असणाऱ्या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यात येणार आहे. त्यामुळे मुलांसाठी सुरक्षित, आनंददायी आणि शैक्षणिक वातावरण निर्माण होईल.
मा. तटकरे म्हणाल्या, “स्मार्ट अंगणवाडी योजना ग्रामीण व शहरी भागातील लहान मुलांना सुरक्षित, स्वच्छ आणि आनंददायी शिक्षणाचे वातावरण उपलब्ध करून देईल. मुलांच्या सर्वांगीण विकासासोबतच महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना महत्त्वाचा टप्पा ठरेल.”
रायगड जिल्ह्यातील माणगाव, तळा, श्रीवर्धन, रोहा, म्हसळा, महाड, अलिबाग, पोलादपूर, कर्जत, खालापूर, सुधागड आणि पनवेल या सर्व तालुक्यांतील अंगणवाड्या या योजनेत समाविष्ट आहेत. या प्रकल्पामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील बालकांना दर्जेदार शिक्षण, पोषण आणि आरोग्यसेवा मिळणार आहे.
अंगणवाडी सेविकांना तंत्रज्ञानाधारित शिक्षण व पोषण व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच, बालकांच्या आरोग्य, पोषणस्थिती व वाढीचा मागोवा घेण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर होईल. या उपक्रमामुळे गर्भवती आणि स्तनदा महिलांनाही आरोग्यसेवा व पोषण मार्गदर्शन अधिक सुलभपणे उपलब्ध होईल.
महिला व बालविकास विभाग राज्यातील सर्व अंगणवाड्या सुसज्ज, आकर्षक आणि कार्यक्षम बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. ‘स्मार्ट अंगणवाडी योजना’ ही बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाने उचललेले दूरदृष्टीचे आणि परिवर्तन घडविणारे पाऊल ठरत आहे.

Related Articles

Back to top button