शिवराय ते बाबासाहेब; प्रेरणादायी विषयांवर रायगडात वक्तृत्व स्पर्धा

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
अलिबाग : विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासपूर्ण विचारसरणी निर्माण व्हावी तसेच इतिहास आणि समाजसुधारकांच्या कार्याची जाण वाढावी या उद्देशाने रायगडचा युवक फाउंडेशनतर्फे १ जून रोजी रायगड जिल्हास्तरीय विद्यार्थी व खुली वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सकाळी १० वाजता वात्सल्य वृद्धाश्रम व गोशाळा, सांबरी येथे होणार आहे.
स्पर्धेत इयत्ता आठवीपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंतच्या स्पर्धकांना सहभाग घेता येणार असून खुला गटही ठेवण्यात आला आहे. स्पर्धेसाठी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे न्यायदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी केलेले कार्य, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अनुभवलेले अंदमानातील दिवस, सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचे शैक्षणिक कार्य तसेच छत्रपती संभाजी राजे यांचे शैक्षणिक कार्य असे प्रेरणादायी विषय देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांनी इतिहास, समाजकारण आणि राष्ट्रपुरुषांच्या कार्याचा अभ्यास करून प्रभावीपणे आपले विचार मांडावेत, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
विद्यार्थी गटासाठी प्रथम क्रमांकाला २००० रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकाला १५०० रुपये व प्रमाणपत्र, तर तृतीय क्रमांकाला १००० रुपये व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. खुल्या गटासाठीही अशीच पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. सहभाग शुल्क १०० रुपये असून सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी नोंदणी डॉ. संदीप वारगे (अलिबाग) मो. ९२७२६९८९२४, प्रा. संतोष पाटील (सांबरी) मो. ९८२०६००८५७, ॲड. सतीश शेळके (कर्जत) मो. ९८८११३२२४८, उदय सबनीस (मुरुड) मो. ९३२५६२४६१६ तसेच ॲड. दीपक पाटील (पनवेल) मो. ९८७०३८३८८१ यांच्याकडे करता येणार असल्याचे आवाहन रायगडचा युवक फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. जयपाल जना परशुराम पाटील यांनी केले.




