म्हाडाच्या पारदर्शक सोडतीतून ५,३५४ घरांचे वाटप; ‘घर म्हणजे आत्मसन्मानाचा पाया’ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
ठाणे, ता. 11 : सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न साकार करण्याचा आजचा दिवस ठरला. “प्रत्येकाचे स्वतःचे घर असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि त्या स्वप्नपूर्तीचा हा क्षण आहे,” असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत ठाणे, ओरोस (सिंधुदुर्ग), तसेच कुळगाव-बदलापूर येथे उभारण्यात आलेल्या ५,३५४ घरांसह ७७ भूखंडांच्या संगणकीय सोडतीचे उद्घाटन शनिवारी ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात त्यांच्या हस्ते पार पडले.

शिंदे म्हणाले, “घर म्हणजे केवळ चार भिंती नाहीत, तर कुटुंबाच्या सुरक्षिततेचा आणि आत्मसन्मानाचा पाया आहे. सर्वसामान्यांना परवडणारी घरे देण्याचे काम म्हाडा सातत्याने करत आहे. पारदर्शक संगणकीय सोडतीच्या माध्यमातून म्हाडाने नागरिकांचा विश्वास जिंकला आहे. कोणताही मानवी हस्तक्षेप न होता, पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने ही सोडत पार पडते, हीच म्हाडाची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे.”

या सोडतीसाठी तब्बल १,८४,९९४ अर्ज प्राप्त झाले असून, सरासरी एका घरासाठी ३५ ते ४० अर्ज प्राप्त झाले आहेत. “यावरून सर्वसामान्यांमध्ये म्हाडाच्या गुणवत्तेवरील आणि किमतीवरील विश्वास वाढत असल्याचे स्पष्ट होते,” असे शिंदे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “पूर्वी म्हाडाची स्थिती वेगळी होती, मात्र आता म्हाडाची घरे उत्कृष्ट दर्जाची आणि वेळेवर पूर्ण होणारी आहेत. म्हाडा ही केवळ गृहनिर्माण संस्था नाही, तर लाखो कुटुंबांच्या आनंदाचे कारण ठरली आहे. आतापर्यंत ९ लाख घरे वितरित केली असून आणखी ६० हजार व ४३ हजार घरांचे प्रकल्प सुरू आहेत.”

ठाणे, कल्याण, मीरा-भाईंदर, डोंबिवली, उल्हासनगर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण प्रकल्प हाती घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. “परवडणारी घरे, नोकरदार महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, गिरणी कामगारांसाठी घरांचे विशेष धोरण आम्ही आणले आहे. तसेच आयटी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांसाठी परवडणारी भाड्याची घरेही योजनेत समाविष्ट केली आहेत,” असे शिंदे म्हणाले.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गतही मोठ्या प्रमाणावर घरे बांधली जात आहेत. “मी मुख्यमंत्री असताना एसआरए आणि म्हाडाच्या रखडलेल्या प्रकल्पांबाबत महत्त्वाची बैठक घेतली. आता हे प्रकल्प सिडको, एमएमआरडीए, महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण केले जात आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

शिंदे म्हणाले, “रमाबाई आंबेडकर नगर येथे १७ हजार घरांचा प्रकल्प उभारला जात आहे. गेल्या २५ वर्षांत तेथे केवळ एकच इमारत उभी राहिली होती. तेथील रहिवाशांना मी १६० कोटी रुपये भाडे वितरित केले आहे. रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी आम्ही सरकारी संस्थांच्या संयुक्त माध्यमातून प्रयत्न करत आहोत.”
राज्य सरकारच्या धोरणानुसार पुढील पाच वर्षांत खासगी आणि सरकारी गुंतवणुकीतून ३० ते ३५ लाख नवीन घरे निर्माण होणार असून, या क्षेत्रात ५० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. “बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेले ‘प्रत्येकाला घर’ हे स्वप्न आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करत आहोत,” असे शिंदे यांनी नमूद केले.

सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या असून, “परवडणारी घरे देण्यासाठी शासन लवकरच निर्णय घेईल,” असे ते म्हणाले. नव्या जीएसटी धोरणामुळे घरांच्या किमती कमी झाल्याने नागरिकांची खरेदीक्षमता वाढली असून, त्यामुळे रोजगारनिर्मितीही वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“म्हाडाने निर्माण केलेला विश्वास आणि गुणवत्ता कायम राखा,” असा सल्ला शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिला. “क्लस्टर प्रकल्पांतर्गत मोठे रस्ते, बागा, वैद्यकीय सुविधा, क्रीडांगणे आणि जिम अशी आधुनिक सोय नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही योजना देशातच नव्हे तर जगातही आदर्श ठरेल,” असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, मुख्याधिकारी रेवती गायकर, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ उपस्थित होते.
सोडतीचा निकाल पाहण्यासाठी सभागृहात एलईडी स्क्रीन आणि **‘वेबकास्टिंग’**च्या माध्यमातून थेट प्रक्षेपणाची सुविधा अर्जदारांसाठी उपलब्ध करण्यात आली होती.




