ताज्या बातम्या

अलिबागच्या रणभूमीवर ‘शेकाप’ची  अस्तित्वासाठीची लढाई! भाजप-शिंदे युतीचा विडा; प्रशांत नाईकांच्या शेकापला संपवण्यासाठी पूर्ण ताकदीनं उघडला मोर्चा,


  1. सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : राजकारणात शत्रू एकत्र आले की कुणाचं भविष्य काळोखात जातं आणि रायगड जिल्ह्यात सध्या हेच चित्र दिसतंय. शेतकरी कामगार पक्षाला (शेकाप) राजकीय नकाशावरून पुसून टाकायचं, हा जणू भाजप-शिंदे युतीने घेतलेला संकल्पच आहे. पण एवढं सोपं नाही! कारण प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वात शेकापचा पराभव ‘डिस्काउंट रेट’मध्ये होणं म्हणजे दिवास्वप्नच!
अलिबागचा गड — शेकापचा शेवटचा किल्ला
जिल्ह्यातील दहा नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ठिकठिकाणी युतीच्या चर्चेला उधाण आले आहे, पण अलिबाग नगरपालिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.
कारण शेकापचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या कन्या अक्षया नाईक रणांगणात उतरल्या आहेत. त्यांच्यामागे शेकाप, काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) युतीची फौज आहे, तर समोर भाजप-शिंदे गटाची ‘एक्झिक्युशन टीम’ सज्ज आहे.
शेकापसाठी अलिबाग म्हणजे ‘अंतिम परीक्षा’
एकेकाळी रायगडचा सम्राट असलेला शेकाप आता स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडतोय. विधान परिषदेतील पराभवानं जयंत पाटील यांच्या प्रतिष्ठेचा फुगा फुटलाच.
सुनिल तटकरे आणि भाजप यांच्या ‘गोड कटकारस्थानामुळे’ तो पराभव झाला, हे आता उघड गुपित आहे. राज्यात शेकापचं काहीच उरलं नाही. अलिबाग ही त्यांची शेवटची पोस्ट! आणि तीही जर हातातून गेली तर… शेकापचा अध्याय इतिहासात जमा!
भाजपच ‘ऑपरेशन शेकाप फिनिश’
भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी स्पष्ट रणनिती आखली आहे. “या निवडणुकीत शेकापचा पाया उखडायचाच!”
आमदार महेंद्र दळवी यांनी तर उघड कार्यक्रमातूनच जाहीर केलं की, शेकापचा कारभार आता संपला पाहिजे.
याला पार्श्वभूमी आहे. शेकापमधील गोंधळ, चित्रलेखा पाटील यांचा वाढता हस्तक्षेप, आणि त्यामुळेच पाटील घराण्यात फूट!
पंडीत पाटील, भावना पाटील, आस्वाद पाटील, चित्रा पाटील… हे सर्व भाजपच्या गळाला लागले.
हे ‘दुखावलेले’ नेतेच आता शेकापविरुद्ध सूडाने पेटले आहेत. त्यांच्यासाठी अलिबाग ही बदला घेण्याची नामी संधी आहे!
प्रशांत नाईक विरुद्ध व्याही आमदार दळवी, राजकारणाचं कौटुंबिक युद्ध!
या लढाईत एक वेगळा ट्विस्ट म्हणजे आमदार दळवी हे प्रशांत नाईक यांचे व्याही!
म्हणजे, ही निवडणूक फक्त राजकीय नाही… कौटुंबिक सुद्धा आहे!
मतदार आता विचारतोय “दळवी खरंच शेकापला डॅमेज करतील का, की नात्यामुळे हात आखडता घेतला जाईल?”
मात्र, युतीने जर जरा जोर लावला, तर अलिबागच्या नगरपालिकेत शिरकाव करून पुढच्या पाच वर्षांत शेकापला जमिनदोस्त करण्याची खेळी ते निश्चित रचू शकतात.
अलिबाग नगरपालिकेची निवडणूक म्हणजे साधी लढाई नाही. ही शेकापच्या अस्तित्वासाठीची परीक्षा आणि युतीसाठी राजकीय प्रतिष्ठेचा जुगार! जर शेकाप काही अंशी हरला, तर एक हाती नगरपालिका राखण्याचे गणित चुकणार.  पण जर अक्षया नाईकांनी विजय मिळवला, तर जयंत पाटील यांना नवसंजीवनी मिळेल, आणि शेकाप पुन्हा रणांगणावर झेपावेल.

Related Articles

Back to top button