ऊर्जाक्षेत्रात महाराष्ट्राचा डंका : आभा शुक्ला व महावितरणला राष्ट्रीय पातळीवर गौरविले
नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय शिखर परिषदेत सन्मान

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
मुंबई, दि. २६ : राज्याच्या ऊर्जाक्षेत्रातील प्रभावी कामगिरीबद्दल महाराष्ट्राला राष्ट्रीय पातळीवर दुहेरी सन्मान मिळाला आहे. अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांना ‘वूमन इन एनर्जी अवॉर्ड २०२५’ तर महावितरणला ‘एनर्जी कंपनी (पॉवर) अवॉर्ड’ ने गौरविण्यात आले. नवी दिल्लीतील इकॉनॉमिक टाइम्स आयोजित राष्ट्रीय एनर्जी लिडरशिप शिखर परिषद २०२५ मध्ये गुरुवारी (दि. २५) हा पुरस्कार प्रदान झाला.
केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि माजी ऊर्जा सचिव अनिल राजदान यांच्या हस्ते शुक्ला यांना सन्मानित करण्यात आले. या परिषदेत देश-विदेशातील सुमारे ५०० प्रतिनिधी सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र तसेच सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
ऊर्जाक्षेत्रातील सुधारणा, सौर कृषिवाहिनी योजना २.०, सौर कृषिपंप योजना आणि हरित ऊर्जेवरील भर या उपक्रमांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात वीजदर घट, रोजगारनिर्मिती आणि गुंतवणुकीच्या संधी निर्माण झाल्या आहेत.
राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे आतापर्यंत २४५८ मेगावॅट क्षमतेचे ४५४ सौर प्रकल्प पूर्ण झाले आहेत, तर ६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र सौर कृषिपंप स्थापनेत देशात पहिल्या क्रमांकावर आहे.
राष्ट्रीय निवड समितीने (अध्यक्ष: माजी केंद्रीय ऊर्जा सचिव अनिल राजदान) लोकाभिमुख योजना, प्रभावी अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष लाभांच्या निकषांवर शुक्ला व महावितरणची ‘एनर्जी लिडरशिप अवॉर्ड २०२५’ साठी निवड केली.




