रोहा शहराच्या सांस्कृतिक क्षितिजावर उजळले नवे सोनेरी पान
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते चिंतामणराव देशमुख नाट्यगृहाचे लोकार्पण

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रोहा, दि. १२ सप्टेंबर :
रोहेकरांच्या डोळ्यात अनेक वर्षांपासून जपलेले सांस्कृतिक स्वप्न अखेर आज साकार झाले. रोषणाईत उजळलेले आणि अभिमानाने दिमाखात उभे असलेले डॉ. चिंतामणराव देशमुख नाट्यगृह हे स्वप्न खासदार सुनील तटकरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे वास्तवात उतरले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते या नाट्यगृहाचे लोकार्पण झाले, आणि रोहेकरांच्या हृदयात समाधानाचा व अभिमानाचा झंकार दणाणून गेला.

सांस्कृतिक वैभवाचे नवे घर
सभागृहाचे दार उघडताच नजरेत भरते ती विशाल रंगमंचाची दिमाखदार रचना, उत्कृष्ट ध्वनीव्यवस्था, आधुनिक आसनव्यवस्था आणि सर्व सोयींनी सजलेले वातावरण. रोहेकरांच्या स्वप्नाला मूर्त रूप मिळाले आहे, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत होती. डॉ. चिंतामणराव देशमुख यांच्या नावाने साकारलेले हे नाट्यगृह म्हणजे ज्ञान, विद्वत्ता आणि सांस्कृतिक समृद्धीला दिलेली अभिवंदना आहे.


लोकार्पण सोहळ्याचा जल्लोष
कार्यक्रमस्थळी नागरिकांचा जनसागर उसळला होता. टाळ्यांचा कडकडाट, घोषणांचा गजर आणि स्वागताची रंगत – सर्वत्र अभिमानाची लाट होती. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटनावेळी मा. ना. कु. अदिती तटकरे, मा. श्री. अनिकेत तटकरे, ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव व सयाजी शिंदे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती सोहळ्याला विशेष देखणेपणा आणून गेली.

“रोहेच्या सांस्कृतिक प्रवासाला नवी दिशा देणारे हे नाट्यगृह भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल,” असे उद्गार मान्यवरांच्या भाषणातून व्यक्त झाले.
रंगभूमीवर हशा, सभागृहात टाळ्या
उद्घाटनानंतर लगेचच ‘मोरूची मावशी’ या नाट्यप्रयोगाने रसिकांची मनं जिंकली. रंगभूमीवर घडणाऱ्या धम्माल प्रसंगांनी हशा पिकवला, तर रसिकांच्या टाळ्यांनी नव्याने उभारलेले सभागृह दणाणून गेले. हा पहिलाच प्रयोग असल्याने रोहेकरांना एक वेगळाच अभिमान आणि आनंद लाभला.

रोहेकरांची उंच भरारी
या नाट्यगृहामुळे रोहा व परिसरातील कलाकारांना स्वतःच्या गुणांचे दर्शन घडवण्याची संधी मिळेल. सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने, परिसंवाद, शैक्षणिक उपक्रम – सर्व क्षेत्रांसाठी हे व्यासपीठ उपयोगी ठरणार आहे. रोहेकरांच्या सांस्कृतिक जीवनातील हे खरेच नवे पर्व असून, शहराचा अभिमान अधिक उंचावणारे ठरले आहे.




